पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. ‘मन की बात’ चा हा ८९ वा भाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने स्टार्टअप्समध्ये केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. देशातील युनिकॉर्नची संख्या १०० वर पोहचली असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, याच महिन्याच्या ५ तारखेला युनिकॉर्नची संख्या १०० वर पोहचली आहे. एक युनिकॉर्न म्हणजे किमान साडे सात हजार कोटींचा स्टार्टअप. या युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य ३३० अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे २५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
एकूण युनिकॉर्नपैकी ४४ युनिकॉर्न हे गेल्या वर्षीच तयार झाले होते. तर या वर्षातील ३ ते ४ महिन्यांत आणखी १४ नवीन युनिकॉर्न तयार झाले आहेत. त्यामुळे जागतिक महामारीच्या काळातही आपले स्टार्टअप, संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर हा अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे. येत्या काही वर्षांत या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
ई-कॉमर्स, फिन-टेक, एड-टेक, बायो-टेक अशा अनेक क्षेत्रांत युनिकॉर्न काम करत आहेत. तसेच भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहान नगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
अनिल परबांनी मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती
‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’
…तर १९४७ची परिस्थिती पुन्हा निर्माण होईल!
यासिन प्रकरणावरून टीका करणाऱ्या इस्लामिक परिषदेला भारताने ठणकावले
देशाच्या या यशामागे देशाची युवाशक्ती, येथील प्रतिभा आणि सरकार अशा सर्वांचे योगदान आहे. या स्टार्ट-अपच्या जगात योग्य मार्गदर्शन गरजेचं असतं. भारतात असे अनेक मार्गदर्शक आहेत ज्यांनी स्टार्ट-अपला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःला समर्पित केले आहे आणि त्याचा अभिमान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.