भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्र असलेल्या यशोभूमी या भव्यदिव्य केंद्राचे उद्घाटन केले. या केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान मेट्रोच्या माध्यमातून उद्घाटनस्थळी पोहोचले.
द्वारका सेक्टर २१पासून जाणाऱ्या दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्स्प्रेस लाइनचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. याच मेट्रो लाइनला यशोभूमी केंद्र जोडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणाही यावेळी केली. कौशल्यपूर्ण काम करणाऱ्यांसाठी ही योजना असून या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दलही पंतप्रधान बोलले.
१३ हजार कोटींची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली असून बँक हमीसह ३ लाखांचे कर्ज कुशल कामगारांसाठी देण्यात येणार आहे. पंतप्रधान म्हणाले की, या योजनेअंतर्गत अतिशय कमी व्याजदर असेल. प्रारंभी, १ लाखाचे कर्ज देण्यात येईल आणि हे कर्ज फेडण्यात त्या व्यक्तीला यश आले तर त्याला आणखी २ लाखांचे कर्ज दिले जाईल.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल म्हणाले की, यशोभूमीच्या रूपात आज भारताला एक भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र लाभले आहे. माझ्या विश्वकर्मा बांधवांसाठी इथे आपले कौशल्य दाखविता येणार आहे. देशातील प्रत्येक विश्वकर्मासाठी हे केंद्र मी अर्पण करत आहे. भारतीय कला आणि हस्तकलांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी हे यशोभूमी केंद्र सहाय्यभूत ठरेल. जसा आपल्या शरीरात पाठीचा कणा महत्त्वाचा असतो तसाच विश्वकर्मा हा समाजासाठी कणा असतो. त्यांच्याशिवाय, दैनंदिन जीवन अशक्यप्राय आहे.
हे ही वाचा:
बेस्ट बसमध्ये पैसे विसरणारे प्रवासी वाढले; चार वर्षांत ८ हजार छत्र्याही लोक विसरले
भारतीय मसाल्यांबाबतचे जगभरात असलेले आकर्षण पुन्हा निर्माण करा
संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने महाराष्ट्रातील सात कलावंतांना सन्मान
संसदेच्या विशेष सत्रापूर्वी आरएसएसच्या बैठकीत महिला आरक्षणावर चर्चा
यशोभूमी कशी असेल
हे केंद्र ७३ हजार चौरस मीटरवर बांधण्यात येणार आहे. त्यात १५ सभागृहे असतील. बैठकांसाठी १३ खोल्या असतील तर ११ हजार लोक एकाचवेळी याठिकाणी एकत्र येऊ शकतील.
मुख्य सभागृहात ६ हजार लोक एकत्र येऊ शकणार आहेत. तेथे बसण्याची अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आलेली आहे. बॉलरूममध्ये अडीच हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे. शिवाय, ५०० लोक बसू शकतील अशी अतिरिक्त जागाही तिथे उपलब्ध आहे.
प्रदर्शनांसाठी जगातील भव्य अशी सभागृहे इथे असून ती १.०७ लाख चौरस मीटरमध्ये वसलेली आहेत. तिथे प्रदर्शने, व्यापारी मेळावे, व्यवसायविषयक कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करता येणार आहे.