पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला ‘मन की बात’ मधून संबोधित केले. ‘मन कि बात’ चा यावेळी ९२ वा भाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी तेथे ‘स्वराज’ मालिकेची स्क्रीनिंग ठेवले होते. त्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाच्या तरुण पिढीला स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या न ऐकलेल्या नायक-नायिकांच्या प्रयत्नांची ओळख करून देण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे. त्यामुळे दूरदर्शनवर स्वराज कार्यक्रम लागणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, दर रविवारी रात्री नऊ वाजता दूरदर्शनवर स्वराज कार्यक्रम प्रसारित केला जातो, जो ७५ आठवडे चालणार आहे. वेळ काढून तो कार्यक्रम सर्वानी पहा आणि तुमच्या घरातील मुलांनाही दाखवा, जेणेकरुन आपल्या देशात स्वातंत्र्याच्या या महान नायकांबद्दल एक नवी जाणीव निर्माण होईल.
भरड धान्यांबद्दल जागरूकता वाढवा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशात बाजरी म्हणजेच भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी खूप काही केले जात आहे. यासंबंधित संशोधन आणि नाविन्यपूर्णतेवर भर देण्याबरोबरच, एफपीओला प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून उत्पादन वाढवता येईल. शेतकऱ्यांनी अधिकाधिक भरड धान्याचा अवलंब करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले आहे.
आता डिजिटल इंडियामुळे भारतातील प्रत्येक गावात सुविधा पोहोचत आहेत. जोरसिंग गावात या महिन्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवसापासून 4G इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. जसे पूर्वी गावात वीज पोहोचली तेव्हा लोक आनंदी होत होते. आता नव्या भारतात 4G पोहोचल्यावर तोच आनंद लोकांना होतो. खेड्यापाड्यातून अनेक संदेश मला येत असतात. जे इंटरनेटमुळे झालेले बदल माझ्यासोबत शेअर करतात. इंटरनेटमुळे देशात तरुण पिढीची अभ्यास आणि शिकण्याची पद्धत बदलली असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
हे ही वाचा:
काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार
‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’
गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार
Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर
देशातील आगामी सणांबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, अवघ्या काही दिवसांत देशात गणेश चतुर्थी सण साजरा केला जाणार आहे. याआधी ओणम सणही सुरू होत आहे. ओणम विशेषत: केरळमध्ये शांतता आणि समृद्धीच्या भावनेने साजरा केला जाईल. १ सप्टेंबर रोजी ओडिशात नुआखाई हा सणही साजरा केला जाणार आहे. नुआखाई म्हणजे नवीन खाद्यपदार्थ, म्हणजेच हा देखील इतर अनेक सणांप्रमाणेच आपल्या कृषी परंपरेशी संबंधित सण आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सणांचा उल्लेख केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्वांना उद्याच्या मेजर ध्यानचंद जी यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो, याची आठवण करून दिली आहे.