विकसित भारताचा पाया मजबूत होतोय !

'मन की बात' मधून पंतप्रधान मोदींचे उद्गार

विकसित भारताचा पाया मजबूत होतोय !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमामार्फत जनतेशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी अवकाश जगताशी संबंधित तरुणांशी संवाद साधला. ‘नॅशनल स्पेस डे’ आणि चांद्रयान-३ बद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, २१ व्या शतकात भारतात अनेक गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत आहे. जसे की, २३ ऑगस्टला आपण सर्व देशवासीयांनी पहिला ‘राष्ट्रीय अवकाश दिवस’ साजरा केला. गेल्या वर्षी याच दिवशी चांद्रयान-३ हे चंद्राच्या दक्षिणेकडील शिव-शक्ती बिंदूवर यशस्वीरित्या उतरले होते. ही गौरवशाली कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, या वर्षी मी लाल किल्ल्यावरून राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुणांना राजकीय व्यवस्थेशी जोडण्याचा कौल दिला आहे. यावर मला प्रचंड प्रतिक्रिया आल्या. यावरून लक्षात येते की आपले तरुण किती मोठ्या संख्येने राजकारणात येण्यास तयार आहेत. ते फक्त योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शनाच्या शोधात असतात.

स्वातंत्र्यलढ्यातही राजकीय पार्श्वभूमी नसलेले समाजातील प्रत्येक घटकातील अनेक लोक पुढे आले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आज पुन्हा एकदा त्याच आत्म्याची गरज आहे. मी माझ्या सर्व तरुण मित्रांना या मोहिमेत नक्की सहभागी होण्यासाठी सांगेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘हर घर तिरंगा संपूर्ण देश तिरंगा’ या अभियानाने पूर्ण उंची गाठली. या अभियांशी संबंधित देशाच्या काना-कोपऱ्यातून फोटो आले होते. घर, शाळा, कॉलेज, महाविद्यालयांवर आम्ही झेंडे फडकलेले पाहिले. लोकांनी आपल्या दुकानात आणि कार्यालयात तिरंगा लावला. हर घर तिरंगा वेबसाइटवर पाच करोडहून अधिक सेल्फी पोस्ट झाले. या मोहिमेने संपूर्ण देशाला एकत्र बांधले आहे अन हे ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘रक्षा बंधना’चा उल्लेख आपल्या भाषणात केला. आपण १९ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला. त्याच दिवशी जगभरात ‘जागतिक संस्कृत दिन’ही साजरा करण्यात आला. आजही भारतात आणि परदेशात संस्कृतबद्दल लोकांमध्ये असलेली विशेष ओढ दिसून येते. जगातील अनेक देशांमध्ये संस्कृत भाषेवर विविध प्रकारचे संशोधन व प्रयोग होत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. यासह पंतप्रधान मोदींनी विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा ११३ वा भाग होता. यापूर्वी २८ जुलै रोजी ११२ वा भाग प्रसारित झाला होता.

 

Exit mobile version