पंतप्रधान मोदींचा कानपूर दौरा रद्द

पंतप्रधान मोदींचा कानपूर दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी होणारा कानपूरचा दौरा रद्द केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. एका निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी २४ एप्रिल रोजी कानपूरमध्ये २०,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार होते. मात्र पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा रद्द केला.

निवेदनात पुढे सांगण्यात आले आहे की, या हल्ल्यात कानपूरचा युवक शुभम याचा गोळी लागून मृत्यू झाला. कानपूरकरांच्या भावना लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या दुःखद प्रसंगी कानपूरमध्ये कोणताही उत्सव वा औपचारिक सार्वजनिक कार्यक्रम न घेणेच योग्य ठरेल, असे समजण्यात आले आहे.

हेही वाचा..

पहलगाम हल्ल्यात विशाखापट्टणमच्या निवृत्त बँकरचा मृत्यू

पहलगाम हल्ला : मुंबईतील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

पाकिस्तानने हात केले वर! म्हणाले, आम्ही नाही त्यातले !!

… आणि ती सहल अखेरची ठरली; डोंबिवलीतील हेमंत जोशींचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू

त्याआधी, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. दिल्लीला पोहोचताच विमानतळावर त्यांनी तातडीची बैठक घेतली. या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव उपस्थित होते.

सांगण्यात येते की, श्रीनगरपासून सुमारे ३० मैल दूर असलेल्या बैसरन व्हॅली या पर्यटन स्थळी झालेल्या या हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या क्रूर हल्ल्याची देश-विदेशातून तीव्र शब्दांत निंदा होत आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर सरकारने पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करत नुकसानभरपाईची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना २ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Exit mobile version