पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० लाख कर्मचार्यांसाठी ‘रोजगार मेळा’ भरती मोहीम सुरू केली. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याचा शुभारंभ केला. यावेळी ७५ हजार जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, येत्या काही महिन्यांत लाखो तरुणांना भारत सरकार वेळोवेळी नियुक्ती पत्रे प्रदान करेल.आज केंद्र सरकारच्या खात्यांनी इतकी तत्परता दाखवण्यामागे त्यामागे ७-८ वर्षांची मेहनत आहे. काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांनी १०० वर्षे जुनी बेरोजगारीची समस्या १०० दिवसांत सुटू शकत नाही, अशी कोपरखळी मारली.
सर्व देशवासियांना धन्वंतरी तुम्हांला सुखी ठेव आणि माँ लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर असो हीच मी देवाला प्रार्थना करतो अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की भारताच्या युवा शक्तीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या ८ वर्षांपासून देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरू आहे, त्यात आज रोजगार मेळाव्याचा आणखी एक आयाम जोडला जात आहे.
मागील ८ वर्षात लाखो तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आपण स्वावलंबी भारताच्या वाटेवर चालत आहोत. यामध्ये आमचे नवोन्मेषक, उद्योजक, उद्योजक, शेतकरी, सेवा आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील सहयोगी यांचा यात यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर येत्या काही महिन्यांत भारत सरकारकडून अशाच प्रकारची नियुक्ती पत्रे लाखो तरुणांना वेळोवेळी देण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
या रोजगार मेळाव्याअंतर्गत पात्र उमेदवारांना सुमारे १० लाख नोकऱ्या दिल्या जातील. निवड झालेल्या उमेदवारांचा भारत सरकारच्या अंतर्गत असलेल्या ३८ मंत्रालये आणि विभागांमध्ये समावेश होईल. गट अ आणि ब (राजपत्रित), गट ब (अराजपत्रित) आणि गट क स्तरावरील उमेदवारांना सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.
अर्थव्यवस्थेतील उणिवा दूर केल्या
कर्मयोगींचा मोठा संकल्प असतो असे सांगून पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या ७-८ वर्षात आम्ही १० वरून ५ वर झेप घेतली आहे. हे शक्य होत आहे कारण गेल्या ८ वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेतील ज्या उणिवांमुळे अडथळे निर्माण होत होते, त्या उणिवा आम्ही दूर केल्या आहेत.