पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी नागपुर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी भागाचे उद्घाटन करणार आहेत. त्याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) आणि रिच-४ (सेंट्रल अव्हेन्यू) मार्गाचेही उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होण्याची प्रतीक्षा होती. तसेच मेट्रो मार्ग तयार न होऊनही नागरिक उद्घाटनाची वाट पाहत होते. जानेवारी महिन्यात भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नागपुरात येणार आहेत. महामेट्रोच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ नागपूर आणि पुणे मेट्रो आणि नाशिक मेट्रो निओच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले की, उद्घाटनापूर्वी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्णपणे तयार होईल.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा आहे. तर महामार्ग १२० मीटर रुंद आहे. महामार्गावर आठ लेन करण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्ग नागपूरच्या बुटीबोरी, वर्धा, अमरावती, जालना, औरंगाबाद आणि नाशिकमधून शिर्डीपर्यंत जाईल. समृद्धी महामार्ग राज्यातील १० जिल्हे, २६ तहसील आणि ३९२गावांमधून जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २४ जिल्हे एकमेकांशी जोडले जातील. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास २४ तासांत पूर्ण करता येणार आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र विधिमंडळात मांडण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार या प्रकल्पावर २५,१६५.३४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या प्रकल्पाची एकूण किंमत ५५,३३५. ३४ कोटी रुपये आहे.