पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करत आहेत. याअंतर्गत दहा लाख लोकांना रोजगार दिला जाणार आहे. पीएम मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात ७५ हजार उमेदवारांना नियुक्ती पत्र देणार आहेत. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधानांनी डिसेंबर २०२३ पर्यंत १० लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियुक्ती मोहिमेचा शुभारंभ करण्यासोबतच ५० केंद्रीय मंत्री देशभरातील सुमारे २० हजार लोकांना नियुक्ती पत्र देणार आहेत. रोजगार मेळाव्यात विविध प्रकारच्या लोकांना सरकारी नोकऱ्या मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. विविध सरकारी नोकऱ्यांसाठी निवड झालेल्यांपैकी काहींना शनिवारीच नियुक्तीपत्रेही दिली जाणार आहेत.
कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार नाहीत, त्यांना पोस्ट किंवा ई-मेलद्वारे नियुक्तीपत्रे पाठविण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय दिल्लीत केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह दिल्लीत नियुक्तीपत्रांचे वाटप करणार आहेत.
विविधी ठिकाणी केंद्रीय मंत्री देणार नियुक्ती पत्रे
केंद्र सरकारमधील नोकऱ्यांसाठी निवडलेल्या १९,६९२ लोकांना ५० केंद्रीय मंत्री नियुक्ती पत्रे सुपूर्द करतील. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे नियुक्ती पत्र देण्यासाठी जयपूरमध्ये असतील. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया भोपाळमध्ये, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर चंदीगडमध्ये असतील. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री वीरेंद्र कुमार इंदूर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल मुंबई, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल गुवाहाटीमध्ये असतील, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान भुवनेश्वर, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी पटियालामध्ये असतील आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन चेन्नईत असतील.
हे ही वाचा:
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात
सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
वेगवेगळ्या मंत्रालयात नियुक्त्या
मिळालेल्या माहितीनुसार, निवडलेले ७५ हजार पुरुष आणि महिला उमेदवार ज्यांना पंतप्रधान मोदी शनिवारी नियुक्ती पत्र देणार आहेत, ते वेगवेगळ्या मंत्रालय आणि विभागांमध्ये काम करणार आहेत. यामध्ये संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, श्रम आणि रोजगार मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो, सीमाशुल्क, बँकिंग इत्यादींमध्ये रोजगाराचा समावेश असेल.