पंतप्रधान मोदींनी घेतली कॉलर वाली वाघीण आणि ‘विराट’ची दखल

पंतप्रधान मोदींनी घेतली कॉलर वाली वाघीण आणि ‘विराट’ची दखल

प्रत्येक प्राणिमात्राबद्दल करुणा, दया हा आपला संस्कृतीचा भाग आहे आणि आपला सहज स्वभावही आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला नुकताच दोन घटनांवरून आला, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पात मृत्युमुखी पडलेली वाघीण आणि राष्ट्रपतींच्या सुरक्षादलातील घोडा विराट यांची दखल घेतली.

‘मन की बात’ या संवादात्मक कार्यक्रमात पंतप्रधानांनी विविध विषयांना स्पर्श करताना विशेषत्वाने या वाघिणीचा आणि घोडा विराटचा उल्लेख केला. ते म्हणाले की, या वाघिणीला कॉलर वाली वाघीण असेही म्हटले जात असे. तिचे लोकांशी इतके घट्ट नाते तयार झाले होते की, तिच्या मृत्युनंतर लोक भावूक झाले. या वाघिणीच्या निधनामुळे लोकांना आपल्यातीलच कुणीतरी एक व्यक्ती गेल्याचे दुःख झाले. म्हणूनच तिच्या पार्थिवावर योग्य पद्धतीने त्यांनी अंत्यसंस्कार केले, तिला अश्रुपूर्ण निरोप दिला, तिचा फोटो लावून तिच्याप्रती प्रेम दाखविले. लोकांनी दाखविलेल्या या प्रेमाचे देशभरात कौतुक झाले. भारतीय लोकांची हीच ओळख आहे. आपण जीवांशी हे मैत्र जपतो. प्रजासत्ताक दिनीही आम्हाला याची प्रचीती आली.

मोदी म्हणाले की, विराट हा घोडा २००३मध्ये राष्ट्रपती भवनात आला. प्रजासत्ताक दिनी परेडला तो सगळ्या दलाचे नेतृत्व करत असे. विदेशी राष्ट्राध्यक्ष येत तेव्हाही तो आपली भूमिका निभावत असे. सेनाप्रमुखांद्वारा कोस कमेंडेशन कार्ड त्याला त्याच्या या कामगिरीबद्दल देण्यात आले. त्याला त्यादिवशी भव्य निरोप देण्यात आला.

पंतप्रधानांनी यावेळी राष्ट्रीय युद्ध स्मारक, अमर जवान ज्योती, नेताजींचा इंडिया गेटसमोर उभारण्यात आलेला पुतळा याविषयी भाष्य केले. हे राष्ट्रीय युद्ध स्मारक पाहायला सगळ्यांनी आपल्या कुटुंबासोबत या. याठिकाणी १९४७नंतर युद्धात शहीद झालेल्या जवानांची नावे नमूद करण्यात आली आहेत, त्यांना सलाम करा, असे आवाहनही केले.

हे ही वाचा:

…तर वायनरी त्यांच्या नावावर करायला तयार!

या मंत्र्याने म्हटले, २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात!

“नथुरामने गांधींचा ‘वध’ केला”

‘संजय राऊत यांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक’

 

प्रधानमंत्री बाल पुरस्काराबद्दलही पंतप्रधान बोलले. ज्या मुलांनी छोट्या वयात प्रेरणादायी काम केली आहेत, अशा मुलांबद्दल आपण आपल्या मुलांना सांगायला हवे. त्यामुळे मुलांना प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले.

पद्म पुरस्कार मिळालेल्या काही व्यक्तींचा खास उल्लेख पंतप्रधानांनी केला. महिलांच्या सबलीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बसंती देवी, मणिपूरच्या ७७ वर्षीय लॉरेम्बम बिनो देवी, अर्जुन सिंग, अमाई महालिंगा नाईक यांचा विशेष उल्लेख त्यांनी केला.

देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त १ कोटी मुलांनी पोस्ट कार्डच्या माध्यमातून आपल्याला पत्र पाठविल्याचेही मोदी म्हणाले.  त्यातील निवडक पोस्ट कार्ड त्यांनी वाचून दाखविली. आसामच्या गुवाहाटीतून पत्र लिहिणारी रिद्धीमा, उत्तर प्रदेशच्या प्रयागराजची नव्या वर्मा,

चेन्नईचा मोहम्मद इब्राहिम, मध्यप्रदेशमधील भावना, गोव्यातून लॉरेन्शियो परेरा यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

श्यामजी कृष्ण वर्मांबद्दलही ते म्हणाले. परदेशात स्वातंत्र्यपूर्व काळात स्थायिक असलेल्या श्यामजींची अंतिम इच्छा होती की, आपल्या अस्थी भारतात आणल्या जाव्यात. खरे तर, १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या दुसऱ्या दिवशी या अस्थी आणायला हव्या होत्या. पण ते काम झाले नाही. मला ते सौभाग्य मिळाले. २००३मध्ये मी मुख्यमंत्री असताना त्या अस्थी आणल्या. कच्छमध्ये त्यांचे स्मारक बनले आहे. मला क्रोएशियातून ७५ पोस्टकार्ड मिळाली आहेत. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टसकडून ही पोस्टकार्ड्स आली आहेत, असेही ते म्हणाले.

तामिळनाडूच्या तायम्मल यांची कहाणीही पंतप्रधानांनी ऐकविली. त्या गेली अनेक वर्षे नारळ विकून गुजराण करतात. तायम्मलजी यांनी मुलांना शिकविले आहे. त्यांची मुले पंचायत शाळेत शिकत. तायम्मल यांनी शाळेच्या विकासासाठी आपण जमवलेल्या पुंजीतील १ लाख रुपये दान केले. यासाठी मोठे हृदय हवे, असे पंतप्रधान म्हणाले.

Exit mobile version