‘पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान’

'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

‘पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान’

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. कुवेतमध्ये पंतप्रधान मोदींना तेथील सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ देऊन सन्मानित केले आहे. ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ ही कुवेतमधील नाइटहूडची ऑर्डर आहे. हे राष्ट्रप्रमुख आणि परदेशी सार्वभौम आणि राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिले जाते. यापूर्वी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या जागतिक नेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतर देशांकडून मिळालेला हा २० वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी कुवेतच्या ‘बायान पॅलेस’ (कुवेतच्या अमीराचा मुख्य राजवाडा) येथे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कुवेतला पोहोचले आहेत. गेल्या ४३ वर्षात भारतीय पंतप्रधानांची या आखाती देशाला झालेली ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी १९८१ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुवेतला भेट दिली होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्वीटरवर लिहिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतच्या ‘बायान पॅलेस’मध्ये पोहोचले, जेथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

हे ही वाचा : 

दिल्लीतील बांगलादेशी होणार हद्दपार

१८५७ च्या उठाव काळातील विहीर सापडली !

मंत्र्यांच्या कामाचा ३ महिन्यांनी आढावा, परफॉर्मन्स चांगला नसल्यास देणार डच्चू!

‘देश प्रथम, बांगलादेशींवर उपचार करू नयेत’

पंतप्रधान मोदींनी शनिवारी एका भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित केले आणि एका भारतीय कामगार शिबिरालाही भेट दिली. भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि भारतीय समुदाय हा कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे.

कुवेत हा भारताच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १०.४७ अरब अमेरिकी डॉलर इतका होता. कुवेत हा भारताचा सहावा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा  पुरवठादार आहे, जो देशाच्या तीन टक्के ऊर्जा गरजा पूर्ण करतो.

Exit mobile version