‘द शोमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूर यांची १४ डिसेंबर रोजी १०० वी जयंती आहे. यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर कपूर कुटुंबाची आज (११ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कपूर कुटुंबीयांसोबत संवाद साधत राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या कपूर कुटुंबातील तिसऱ्या पिढीला मार्गदर्शनही केले.
या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, करिश्मा आणि रिद्धिमा यांच्यासह कपूर कुटुंबातील इतर सदस्य आहेत. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी अभिनेत्री करीना कपूर यांचा मुलगा तैमुर आणि जेह यांच्यासाठी ऑटोग्राफ दिला.
कपूर कुटुंबांच्या सदस्यानी पंतप्रधान मोदीना खास भेटवस्तूही दिल्या. यावेळी कपूर कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत पंतप्रधान दिलखुलास गप्पा मारताना दिसले. आपल्या मौल्यवान वेळेत कपूर कुटुंबांशी भेट घेत संवाद साधल्यामुळे, सन्मान दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी राज कपूर यांचा चित्रपट पाहिल्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, जनसंघाचा काळ होता आणि दिल्लीच्या निवडणुका होत्या. निवडणुकीत जनसंघाच्या लोकांचा पराभव झाला. त्यावेळी अडवाणी आणि वाजपेयी यांनी म्हटले, निवडणुका तर आपण हारलो आता काय करायचे?, यावर आम्ही चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आणि चित्रपट पाहायला गेलो. त्यावेळी राज कपूर यांचा ‘फिर सुबह होगी’ (पुन्हा सकाळ होईल ) हा चित्रपट पाहिला. जनसंघाचे दोन नेते पराभवानंतर चित्रपट पाहायला जातात पुन्हा सकाळ होईल आणि आज बघा ‘पुन्हा सकाळ झाली’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींची भेट झाल्यानंतर अभिनेत्रींनी भेटीचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचा अनुभवही सांगितला.
दरम्यान, राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. या काळात राज कपूरचे चित्रपट ४० शहरे आणि १३५ चित्रपटगृहांमध्ये दाखवले जाणार आहेत.
हे ही वाचा :
जोडे पूजण्यासाठी, जोडेपुशे म्हटले; जोड्यांनी मार खाल्ला…
काबुलमध्ये झालेल्या स्फोटात अफगाणिस्तानचे निर्वासित मंत्री ठार
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण, पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल!
दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळा!