वर्ल्डकप अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून हार सहन करावी लागली. या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. सामन्यानंतर त्यांनी दोन्ही संघातील खेळाडूंची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो आता खेळाडूंनी आपापल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही हे फोटो शेअर केले असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला मिठी मारून त्याचे सांत्वन करताना दिसत आहेत. मोदींनी खेळाडूंना पाठिंबा दिला आणि त्यांचा आत्मविश्वास अबाधित राहावा यासाठी त्यांच्याशी संवाद साधला.
या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या शमीला जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये पंतप्रधान भेटले तेव्हा शमीने मोदींना मिठी मारली. शमीने हा फोटो एक्सवर शेअर केला. त्यात त्याने म्हटले आहे की, दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. पण मी सर्व भारतीयांचे आभार मानतो की त्यांनी मला आणि आम्हा सर्व क्रिकेटपटूंना पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार कारण ते स्वतः या सामन्यासाठी आले आणि ड्रेसिंग रूममध्ये येऊन त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही नक्कीच पुन्हा एकदा नव्या उत्साहाने मैदानात परतू.
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मोदींनी आमच्या ड्रेसिंग रूमला भेट दिली तो क्षण खरोखरच विशेष होता आणि आमचा उत्साह वाढविणारा होता, असे जाडेजाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे हौथी दहशतवाद्यांकडून अपहरण
पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या
दोन वर्षांनंतर पुन्हा म्यानमार अस्वस्थ; भारताच्या गोटातही चिंतेचे वातावरण
भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?
नाणेफेकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर आपले मत व्यक्त केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, तुमची गुणवत्ता आणि जिद्द या स्पर्धेत दिसून आली. तुम्ही एका वेगळ्या जिद्दीने या स्पर्धेत खेळलात त्यातून भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केलीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि नेहमीच राहू.
भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यातील या अंतिम सामन्यासाठी अहमदाबाद येथे मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममधये जमले होते. जवळपास लाख सव्वालाख क्षमतेचे हे स्टेडियम पूर्ण भरले होते. मात्र भारतावर सहा विकेट्सनी विजय मिळविण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. ऑस्ट्रेलियाचा हा सहावा विश्वविजय होता.