पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवार, ३ एप्रिल रोजी सकाळी थायलंडमधील बँकॉकसाठी रवाना झाले. पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी होणाऱ्या सहाव्या बिमस्टेक (BIMSTEC) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्स वरील त्यांच्या पोस्टमधून यासंबंधी माहिती दिली असून त्यांनी लिहिले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान थायलंडला अधिकृत भेट देतील आणि सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होतील. त्यानंतर, ते श्रीलंकेच्या भेटीवर जातील.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या दोन देशांच्या भेतीसंबंधीची माहिती दिली आहे. पुढील तीन दिवस नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंकेत राहून भारताचे या राष्ट्रांशी आणि बिमस्टेक देशांशी संबंध मजबूत करतील. थायलंडचे त्यांचे समकक्ष पैतोंगटार्न शिनावात्रा यांच्याशी भेट आणि बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होणे, असा त्यांचा थायलंडमधील कार्यक्रम आहे. शिवाय ते त्यांच्या दौऱ्यादरम्यान थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न यांचीही भेट घेतील.
पंतप्रधान मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पुढील तीन दिवसांत, मी थायलंड आणि श्रीलंकेला भेट देईन आणि या राष्ट्रांशी आणि बिमस्टेक देशांशी भारताचे सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेईन. बँकॉकमध्ये, पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांची भेट घेणार असून भारत-थायलंड मैत्रीच्या मुद्द्यांवर चर्चा करणार. शुक्रवारी बिमस्टेक शिखर परिषदेत भाग घेऊन नंतर थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न यांचीही भेट घेणार,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
Over the next three days, I will be visiting Thailand and Sri Lanka to take part in various programmes aimed at boosting India's cooperation with these nations and the BIMSTEC countries.
In Bangkok later today, I will be meeting Prime Minister Paetongtarn Shinawatra and…
— Narendra Modi (@narendramodi) April 3, 2025
श्रीलंकेच्या त्यांच्या आगामी दौऱ्याबद्दलच्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले की, “माझी श्रीलंकेची भेट ४ ते ६ तारखेपर्यंत असेल. राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या भारत भेटीनंतर ही भेट होत आहे. आम्ही बहुआयामी भारत-श्रीलंका मैत्रीचा आढावा घेऊ आणि सहकार्याच्या नवीन मार्गांवर चर्चा करू. मी तिथे होणाऱ्या विविध बैठकांची वाट पाहत आहे.”
थायलंडचे पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान मोदी ३ ते ४ एप्रिल दरम्यान थायलंडमधील बँकॉकला ४ एप्रिल रोजी होणाऱ्या ६ व्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भेट देत आहेत. या शिखर परिषदेचे आयोजन सध्याचे बिमस्टेक अध्यक्ष थायलंड करत आहे. पंतप्रधानांचा हा थायलंडचा तिसरा दौरा असेल. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की २०१८ मध्ये काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या चौथ्या बिमस्टेक शिखर परिषदेनंतर बिमस्टेक नेत्यांची ही पहिली प्रत्यक्ष बैठक असेल. शेवटची म्हणजेच पाचवी बिमस्टेक शिखर परिषद मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे व्हर्चुअल स्वरूपात झाली होती.
हे ही वाचा:
चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चीनी चापट…
सद्सदविवेकबुद्धी ज्यांची जागृत आहे ते विधेयकाला समर्थन करतील, विशेषतः उबाठा वाले!
वक्फमध्ये कोणताही गैर-मुस्लिम येणार नाही, विरोधकांनी भीती पसरवली!
बिमस्टेक चौकटीत सहकार्य वाढविण्यासाठी नेत्यांमध्ये विविध संस्था आणि क्षमता-निर्मिती उपाययोजनांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. भारत बिमस्टेकमध्ये प्रादेशिक सहकार्य आणि भागीदारी मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, ज्यामध्ये सुरक्षा वाढवणे; व्यापार आणि गुंतवणूक सुलभ करणे; भौतिक, सागरी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी स्थापित करणे; अन्न, ऊर्जा, हवामान आणि मानवी सुरक्षेत सहकार्य करणे; क्षमता निर्माण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे; आणि लोक-ते-लोक संबंध वाढवणे यांचा समावेश आहे.