आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास उंचावणे, पदक विजेते असो की पदक न जिंकणारे सगळ्याच खेळाडूंचे कौतुक करणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव भारताच्या पुरुष आणि महिला बॅडमिंटनपटूंनीही घेतला. थॉमस कप ही सांघिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केल्यानंतर त्यांची भेट पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी घेतली. लक्ष्य सेन, एच.एस. प्रणय, किदाम्बी श्रीकांत, चिराग शेट्टी, मुलींमध्ये उन्नती हुडा अशा सर्व खेळाडूंशी पंतप्रधानांनी संवाद साधला आणि त्यांचे अनुभव विचारले.
लक्ष्य सेनशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, थॉमस कप जिंकल्यावर मी फोनवरून तुमच्याशी संवाद साधला होता आणि तेव्हा तू मला मिठाई आण असे म्हटले होते. त्याप्रमाणे तू मला मिठाई आणली आहेस. तू आवर्जून ते लक्षात ठेवलेस. लक्ष्य सेन तेव्हा म्हणाला की, युथ ऑलिम्पिकला जेव्हा मी पदक जिंकले तेव्हा मी तुम्हाला भेटलो होतो. आज पुन् भेटतो आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा आत्मविश्वास उंचावतो. मला तिथे अन्नविषबाधा झाली होती, पण नंतर तब्येत सुधारली. लवकर मी सावरलो आणि आपल्या संघासाठी सज्ज झालो.
किदाम्बी श्रीकांतला पंतप्रधानांनी विचारले की, तुला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येणे आणि थॉमस कप जिंकणे या स्वप्नांबद्दल काय वाटते तेव्हा तो म्हणाला की, माझी ही दोन्ही स्वप्ने पूर्ण झाली आहेत. भारत यापूर्वी ही स्पर्धा केव्हाही जिंकला नव्हता पण आम्ही सगळे छान खेळलो, एकजुटीने खेळलो आणि स्पर्धा जिंकली.
सात्विक साईराज रांकीरेड्डी म्हणाला की, आम्हाला तर अजूनही थायलंडला आहोत की काय असे वाटते आहे. थायलंडला स्पर्धा झाल्यावरही आम्ही मेडल गळ्यातून उतरविले नाही. पंतप्रधान त्यावेळी म्हणाले की, मी तुझे ट्विटही पाहिले. तू झोप येत नाहीए असे म्हणाला होतास.
हे ही वाचा:
किशोरवयीन शंभूप्रेमींची महाराजांना अनोखी आदरांजली! अनवाणी पायाने सर केले ५ गड
ठाकरे सरकार आले ताळ्यावर; पेट्रोल २.६ रुपयांनी तर डिझेल १.४४ रुपयांनी स्वस्त
ऑस्ट्रेलियात सत्तांतर! ऍन्थनी अल्बनीज होणार नवे पंतप्रधान
जाणिवांचे प्रतिबिंब कवितांमध्ये : वैभव जोशी
चिराग शेट्टीने सांगितले की, गेल्यावर्षी आम्ही आपल्याला भेटलो होतो पण त्यावेळी ऑलिम्पिक पदक जिंकले नव्हते त्याचे दुःख होते. पण यावेळी थॉमल कपसाठी पदक जिंकण्याचा निश्चय केला होता. ते स्वप्न पूर्ण झाले. यापेक्षा अधिक कशाचाही आनंद नाही. एच.एस. प्रणयने सांगितले की, हा अभिमानाचा क्षण आहे. विशेष म्हणजे ही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची भेट आहे.
उन्नती हुडाने पंतप्रधानांना सांगितले की, आपण पदकविजेते आणि पदक न जिंकणारे खेळाडू यात कधीही भेदभाव करत नाही. या स्पर्धेने बरेच शिकायला मिळाले. पुढील वेळेस मुलींच्या संघाला जिंकायचे आहे. हरयाणामध्ये असे काय आहे की तिथे सगळे जिंकतात, असा पंतप्रधानांनी विचारल्यावर उन्नती म्हणाली की, हे सगळे दूध दही खाऊन होते. तेव्हा सगळेच खळखळून हसले.