पंतप्रधान नरेंद मोदी आज गुजरात आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १७ डिसेंबर रोजी गुजरातमध्ये बांधलेल्या सुरत डायमंड बोर्स (SDB) इमारतीचे उद्घाटन केले.’सुरत डायमंड बोर्स’ हे आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असणार आहे.यामध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक ‘कस्टम क्लिअरन्स हाऊस’, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग तसेच सुरक्षित तिजोरीची यामध्ये सोय करण्यात आली आहे.यापूर्वी जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन संकुलाचा विक्रम म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अमेरिकेच्या पेंटागॉनची नोंद होती.यापुढे आता सुरतमधील ‘सूरत डायमंड बोर्स’ इमारतची नोंद असणार आहे.या इमारतीला बांधण्यासाठी सुमारे ३,५०० कोटी रुपये इतका खर्च आला आहे.हिरे व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या ‘सूरत डायमंड बोर्स’चे उद्घाटन १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते पार पडले.
शनिवारी पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये उद्घाटन समारंभाची माहिती शेअर करताना सांगितलं आहे की, उद्या १७ डिसेंबर रोजी सुरतमध्ये, सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन होणार आहे. यामुळे हिरे उद्योगाला मोठी चालना मिळेल. ‘कस्टम क्लिअरन्स हाउस’ , ज्वेलरी मॉल आणि इंटरनॅशनल बँकिंग आणि सेफ व्हॉल्ट्सची सुविधा हे बोर्सचे महत्त्वपूर्ण भाग असतील.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डायमंड बोर्सचे फोटोही शेअर केले आहेत.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये इमारतीची नोंद
सुरत डायमंड बाजाराचे बांधकाम फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू झाले आणि २०२२ मध्ये पूर्ण झाले.या इमारतीचे नाव यावर्षी ऑगस्टमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. ही इमारत ३५.५४ एकरमध्ये पसरलेली आहे. त्याचे बांधलेले क्षेत्र ६७ लाख चौरस फूट आहे. यापूर्वी जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन संकुलाचा विक्रम अमेरिकेच्या पेंटागॉनकडे होता. पेंटागॉनचे बांधलेले क्षेत्र ६५ लाख स्क्वेअर फूट आहे.त्यांनतर आता जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून ‘सूरत डायमंड बोर्स’या इमारतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
सुरतमध्ये बांधलेल्या या मेगास्ट्रक्चरमध्ये ९ ग्राउंड टॉवर आणि १५ मजले आहेत. नऊ आयताकृती बुरुज मध्यवर्ती मणक्याने जोडलेले आहेत. यामध्ये ३०० चौरस फूट ते एक लाख चौरस फुटांपर्यंतच्या ४,५०० हून अधिक कार्यालयीन जागा आहेत. या इमारतीला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून प्लॅटिनम मानांकन मिळाले आहे.अंदाजे ३,५०० कोटी रुपये खर्चून ही इमारत बांधली आहे.
हे ही वाचा:
नागपूर; सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू!
लंडनमध्ये भारतीय विद्यार्थी बेपत्ता, भाजप नेत्याने एस जयशंकर यांची मागितली मदत!
संसद सुरक्षाभंग प्रकरणातील सर्व आरोपींच्या फोनचे सुटे भाग राजस्थानमधून हस्तगत!
माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचे संस्थान खालसा होण्याच्या वाटेवर!
कार्यालयांव्यतिरिक्त, डायमंड बोर्स कॅम्पसमध्ये सेफ डिपॉझिट व्हॉल्ट, कॉन्फरन्स हॉल, मल्टीपर्पज हॉल, रेस्टॉरंट्स, बँका, कस्टम क्लिअरन्स हाऊस, कन्व्हेन्शन सेंटर, प्रदर्शन केंद्र, प्रशिक्षण केंद्र, मनोरंजन क्षेत्र आणि क्लब यासारख्या सुविधा आहेत. गेल्या काही आठवड्यात अनेक हिरे व्यापारी कंपन्यांनी येथे आपली कार्यालये सुरू केली आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, किरण जेम्सचे संचालक अब्जाधीश हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी यांनी त्यांचा रु. १७,००० कोटींचा व्यवसाय डायमंड बोर्समध्ये हलविला आहे आणि त्यांच्या कर्मचार्यांना राहण्यासाठी एक मिनी-टाउनशिप देखील विकसित करत आहे.
‘सुरत डायमंड बोर्स’ बांधण्याची प्रमुख कारणे
*भारतातून हिरे, रत्ने आणि दागिन्यांची आयात, निर्यात आणि व्यापाराला चालना देण्यासाठी.
*हिरे उत्पादन आणि व्यापारात गुंतलेल्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
*कटिंग, पॉलिशिंग आणि प्रोसेसिंगसह डायमंड, जेम्स आणि ज्वेलरीशी संबंधित व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी.
*भारताला जगातील आधुनिक हिरे, रत्ने आणि दागिन्यांची बाजारपेठ म्हणून विकसित करणे.
*ही इमारत ६५,००० हून अधिक हिरे तज्ञांसाठी एक सोयीस्कर केंद्र बनवण्याचे ध्येय आहे.
मुंबईतले हिरे व्यापारी व्यवसाय बंद करून सुरतला का निघाले?
वर्षानुवर्षे सुरत सिटीला डायमंड सिटी म्हटले जाते.सुरत शहरातील हिरे कारखान्यातील पैलू पाडलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात.याच हिऱ्यांचा व्यवसाय लाखों लोकांना रोजगार मिळवून देतो.सुरतच्या हिरे कारखान्यांमधील पैलू पाडलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मात्र मुंबईचा वापर केला जातो.कारण मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालये सुरु करावे लागत असे ज्याद्वारे सुरतमधील हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवले जायचे, निर्यात केले जायचे. मात्र आता गुजरात मधील सुरतमध्ये बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या डायमंड हब इमारतीमध्ये सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळेच आता मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सुरातच हिरे व्यापारी मुंबईतून आपलं व्यवसाय बंद करून सुरतकडे निघाले आहेत.मात्र, सुरतमध्ये बांधण्यात आलेल्या ‘डायमंड बोर्स’मुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मोठा धक्का बसणार आहे.