मुंबईच्या एक दिवसीय दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१५ जानेवारी) नवी मुंबईतील खारघर येथे इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. नऊ एकरात पसरलेले हे भव्य आणि प्रशस्त मंदिर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी सकाळी पंतप्रधान मोदींनी आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे उद्घाटन केले.
मंदिराच्या उद्घाटनापूर्वी विशेष धार्मिक कार्यक्रम आणि यज्ञविधी करण्यात आले. मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजाही केली. या भव्य मंदिरात वैदिक शिक्षण केंद्र, सभागृह आणि उपचार केंद्राचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) या जागतिक संस्थेतर्फे प्रशस्त कृष्ण मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम करण्यास १२ वर्षे लागली असून त्यासाठी १७० कोटी रुपये खर्च आला आहे. भगवान श्रीकृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचे नाव श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर असे आहे.
हे ही वाचा :
नेत्याचा ‘वसंतदादा’ करत नाहीत, त्यांना अमित शाह म्हणतात…
चुकीच्या दाव्यानंतर ‘मेटा’कुटीला येत मागितली भारताची माफी
कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा दावा!
महाकुंभाची पाकिस्तानसह मुस्लीम देशांना भूरळ, गुगलवर सर्च करण्यात राहिले अव्वल!
“इस्कॉनच्या प्रयत्नांनी, ज्ञान आणि भक्तीच्या या महान भूमीवर श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन होत आहे. अशा विधीमध्ये भूमिका बजावण्याचे पुण्य मला मिळाले हे माझे भाग्य आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी येथे एका सभेला संबोधित करताना सांगितले. “इस्कॉनच्या सर्व संत आणि पुरोहितांच्या अथक परिश्रमाने आणि वचनबद्धतेमुळे हे शक्य झाले आहे आणि मी त्यांचा ऋणी आहे,” ते पुढे म्हणाले.
१६ जानेवारीपासून भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले हे भव्य मंदिर आहे. मंदिराचा मुख्य भाग भगवान श्रीकृष्णाच्या थ्रीडी पेंटिंगने सजवण्यात आला आहे. त्याचबरोबर दशावतार मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत. ज्यावर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत.
मंदिराच्या ९ एकर जागेपैकी ५-६ एकर जमीन निसर्गसंपदेने नटलेली आहे. या मंदिरात तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांसाठी रविवारी मोफत प्रसादाचीही व्यवस्था आहे. दरम्यान, इस्कॉनची जगभरात सुमारे ८०० मंदिरे आहेत. मात्र नवी मुंबईतील हे मंदिर एकमेव आहे, ज्याठिकाणी इस्कॉनचे संस्थापक स्वामी श्रील प्रभुपाद यांचे स्मारक आहे.