गुजरातच्या भरूच येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उत्कर्ष समारोह कार्यक्रमात अयुब पटेल या दृष्टिहिन नागरिकाशी बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. आपल्या दोन्ही मुलींना सरकारी योजनेचा लाभ मिळत असून त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होत आहे, असे अयुब यांनी पंतप्रधानांना सांगितले. या सर्व उपस्थितांशी पंतप्रधानांनी ऑनलाइन संवाद साधला.
पंतप्रधानांनी अयुब पटेल यांना विचारले की, तुमच्या मुलींची महत्त्वाकांक्षा काय आहे? तेव्हा ते म्हणाले की, त्यांना डॉक्टर बनायचे आहे. एक ८वीत आहे तर दुसरी १२वीत शिकत आहे. तिसरी मुलगी आता पहिलीत आहे. माझ्या मुलींची जबाबदारी सरकार उत्तमरित्या घेत असून लहान मुलीची जबाबदारी आठव्या इयत्तेपर्यंत सरकार घेणार आहे. मोठ्या दोघींना सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आहे. मोठी मुलगी डॉक्टर होऊ इच्छिते.
हे ही वाचा:
आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा
मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले
तेव्हा पंतप्रधानांनी त्या मुलीलाही विचारले की, तुला डॉक्टर का व्हावेसे वाटते तेव्हा ती म्हणाली की, माझ्या वडिलांना ज्या वैद्यकीय समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे मी डॉक्टर होण्याचे ठरविले. ते सांगताना ती मुलगी भावूक झाली. ते पाहिल्यानंतर पंतप्रधानही भावूक झाले. काही काळ स्तब्धता पसरली. पंतप्रधानांनी त्या मुलीचे कौतुक केले आणि तिला शाबासकी दिली.
अयुब पटेल यांनी सांगितले की, माझी दृष्टी सौदी अरेबियात नोकरीच्या निमित्ताने गेलेलो असताना गेली. तिथे डोळ्यात एक औषध घातले आणि मला डोळे गमवावे लागले. डॉक्टरांना दाखविल्यावर ते म्हणाले की, आता यावर कोणताही उपाय नाही. अयुब पटेल म्हणाले की, पंतप्रधानांनी नागरिकांप्रती जी आपुलकी दाखविली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. तुम्ही दिल्लीत असलात तरी तुम्ही प्रत्येकाबद्दल चिंता व्यक्त करता. भारताच्या विकासाचा विचार तुम्ही नेहमी करता, त्याबद्दल तुमचे आभारी आहोत, असे अयुब पटेल म्हणाले.