पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ जानेवारी) आंध्र प्रदेश दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशला दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प भेट दिले. विशाखापट्टणम येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी प्रकल्पांची पायाभरणी केली. यामध्ये प्रामुख्याने ग्रीन हायड्रोजन सेंटर आणि मेडिसिन पार्कचा समावेश आहे. आंध्र प्रदेशचा विकास हे आमचे व्हिजन आहे. आंध्र प्रदेशातील जनतेची सेवा करण्याचा आमचा संकल्प आहे. आंध्र प्रदेशने २०४७ पर्यंत सुमारे २.५ ट्रिलियन कमावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही दृष्टी साकारण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने २०४७ मध्ये गोल्डन आंध्रचा पुढाकार घेतला असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
प्रकल्पांची पायाभरणी करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासोबत विशाखापट्टणममध्ये रोड शो केला. गेल्या वर्षी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदींचा हा पहिलाच राज्य दौरा आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आज येथे २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आणि पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळे आंध्र प्रदेशच्या विकासाला नवी उंची मिळेल. या विकास प्रकल्पांसाठी मी आंध्र प्रदेशसह संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो. आंध्र प्रदेश हे नावीन्यपूर्ण स्वरूपामुळे आयटी आणि तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. आता आंध्रला नवीन आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे केंद्र बनण्याची वेळ आली असल्याचे पंतप्रधांनानी म्हटले.
आज ग्रीन हायड्रोजन हे उदयोन्मुख क्षेत्र आहे. देशाने २०२३ मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केले होते. २०३० पर्यंत पाच दशलक्ष मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात दोन ग्रीन हायड्रोजन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांपैकी एक म्हणजे आपले विशाखापट्टणम. भविष्यात, विशाखापट्टणम हे जगातील अशा काही शहरांपैकी एक असेल ज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची सुविधा असेल. या ग्रीन हायड्रोजन केंद्रामुळे अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि आंध्र प्रदेशमध्ये उत्पादन परिसंस्था देखील निर्माण होईल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
विशाखापट्टणमला भेट देण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि इतरांशी संबंधित मोठ्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी मी विशाखापट्टणमच्या लोकांमध्ये येण्यास उत्सुक आहे. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत अशा प्रकारचे पहिले हब बनणार आहे.
दरम्यान, बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान ओडिशाला रवाना होतील. पंतप्रधान गुरुवारी (९ जानेवारी) तेथे १८ व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे उद्घाटन करतील. या परिषदेत सहभागी होण्यासाठी ५० हून अधिक देशांमधून मोठ्या संख्येने भारतीयांनी नोंदणी केली आहे. एकदिवसीय दौऱ्यात मोदी प्रवासी भारतीय एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. प्रवासी भारतीयांसाठी ही एक विशेष पर्यटन ट्रेन आहे, जी निजामुद्दीन, दिल्ली येथून निघेल आणि तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी अनेक पर्यटन आणि धार्मिक महत्त्वाच्या स्थळांना भेट देईल.