चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फोंट हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना गॅब्रिएल बोरिक फोंट यांनी उत्सुकतेने भारतीय ध्वजातील अशोक चक्राबद्दल विचारले. हैदराबाद हाऊसमधील चर्चा कक्षाकडे जाताना, फोंट हे भारतीय ध्वजाजवळ उभे राहिले आणि त्यांनी तिरंग्यामधील अशोक चक्राबद्दल पंतप्रधान मोदींना विचारले. यावेळी नरेंद्र मोदीही त्यांना अशोक चक्राचा अर्थ काळजीपूर्वक समजावून सांगताना दिसले.
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात वरच्या बाजूला केसरी, मध्यभागी पांढरा आणि तळाशी गडद हिरवा रंग आहे. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी चक्र आहे जे उत्तर प्रदेशातील सारनाथमध्ये (वाराणसी) स्थित असलेल्या अशोक सत्तंभावरून घेण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्राला एकूण २४ आऱ्या आहेत. या अशोक चक्राचा रंग निळा आहे. हा निळा रंग आकाश, महासागर आणि वैश्विक सत्याचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे, राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगावर मध्यभागी निळ्या रंगातील अशोक चक्र आहे. या २४ आऱ्या मानवी गुणधर्म प्रदर्शित करतात. त्यासोबतत सर्वांगीण विकास, प्रगती, सातत्य आणि कर्तव्याचा संदेश या आऱ्यांमधून दिला जातो.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फोंट यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फोंट यांनी आज हैदराबाद हाऊस येथे विस्तृत चर्चा केली. व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे, आरोग्य, शेती, हवामान बदल आणि लोकांमधील संबंधांमध्ये भारत-चिली संबंध अधिक दृढ करण्यासाठी सीईपीए वाटाघाटी सुरू करण्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. त्यांनी परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवरही विचार विनिमय केला.
हे ही वाचा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, बोरिक यांचा १ ते ५ एप्रिल दरम्यानचा दौरा दोन्ही देशांमधील आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने आहे. त्यांच्यासोबत मंत्री, संसद सदस्य, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक नेते, माध्यम प्रतिनिधी आणि भारत-चिली देवाणघेवाणीत सहभागी असलेल्या सांस्कृतिक व्यक्तींचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे.