सेनेचे जवान हाच माझा परिवार!

सेनेचे जवान हाच माझा परिवार!

पंतप्रधान मोदी यांनी नौशेरात जवानांसह साजरी केली दिवाळी

प्रतिवर्षाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाही भारतीय जवानांसमवेत दिवाळी साजरी केली. जम्मू काश्मीरमधील नौशेरा येथे पंतप्रधान मोदी जवानांना भेटले. त्यावेळी ते म्हणाले की, नौशेरात मी दाखल झालो तेव्हा मातीला स्पर्श केल्यानंतर मनात विचार आला की, ही भूमी भारताची शौर्यगाथा सांगणारी भूमी आहे. प्रत्येक युद्धाचे, षडयंत्राचे नौशेराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. हे जवान हाच माझा परिवार आहे. आज दिवाळीनिमित्त मी माझ्या परिवारासोबत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात आपल्या समोर अनेक नवे संकल्प आहेत, अनेक उद्दिष्टे आहेत. नौशेराच्या ब्रिगेडने सर्जिकल स्ट्राइकमध्ये जी भूमिका बजावली ती गौरवास्पद होती. सर्जिकल स्ट्राइक करून सूर्यास्ताआधीच सगळे परत येतील असेच ठरले होते. तेव्हा मी फोनवरूनच सगळी माहिती घेत होतो. सगळे जवान सहीसलामत त्याच दिवशी परतले. इथे अशांतता पसरविण्याचा प्रयत्न वारंवार होतो आहे. पण आमच्या जवानांनी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरला जाताना दिल्लीत पंतप्रधानांच्या ताफ्यात कमी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. शिवाय, प्रवासातही कोणतेही कठोर निर्बंध ठेवण्यात आले नव्हते.

याआधी २०२०मध्ये पंतप्रधानांनी राजस्थानच्या जैसलमेर येथील लोंगोवाल बॉर्डरवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जम्मू काश्मीवर व लडाखच्या सीमेवर पंतप्रधान चौथ्यांदा जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. याआधी २०१४मध्ये ते सियाचिनलाही गेले होते.

 

Exit mobile version