पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू आणि काश्मीरला भेट देऊन त्यांनी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये ६ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण केले. त्यानंतर त्यांनी काश्मिरी नागरिकांना संबोधित केले. कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला दौरा होता. यावेळी त्यांनी काही स्थानिक कारागिरांचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी केवळ स्थानिक लोकांना प्रोत्साहनच दिले नाही तर हस्तकलेच्या प्रचारातही योगदानही दिले. श्रीनगर दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी हाताने कातलेली पश्मीना शाल खरेदी केली.
पंतप्रधान मोदींनी मुजतभा कादरी यांच्याकडून हाताने कातलेली एक शाल विकत घेतली. पंतप्रधानांनी ही शाल निवडणे हा बहुमान असल्याचे कादरी यांनी म्हटले आहे. आमच्या ब्रँडसाठी हा एक चांगला क्षण आहे. शालला जीआय टॅग आहे. सरकारच्या हस्तकला विभागामार्फत एक सेवा सुरू केली आहे जिथे ते प्रत्येक शालला क्यूआर कोडसह टॅग करतात. यातून शालीचे सर्व तपशील दिले जातात. शाल हाताने कातलेली आहे की हाताने विणलेली आहे, शालीचा मायक्रॉन काय आहे आणि कोण निर्माता आहे असा सर्व तपशील यात असतो, अशी माहिती त्यांनी दिली. या जगात टिकाऊपणा शोधत असताना आमच्याकडे काश्मीरमधील हे सर्वात टिकाऊ उत्पादन आहे. ते काश्मीरमध्ये ७०० वर्षे टिकून आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. काश्मीरमधील हाताने कातलेल्या पश्मिना शालची तुलना जगात कुठेही होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?
उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!
रशियाच्या मिसाईलपासून झेलेन्स्की थोडक्यात बचावले
काश्मीरच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी यास्मिना जान या कारागिरांपैकी एकाशी देखील संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेव्हा त्यांनी कारागिरांना आधुनिक चरखा वापरताना पाहिले आणि त्याबद्दल विचारले. यास्मिनाने नंतर आधुनिक चरखा वापरण्याच्या फायद्यांविषयी पंतप्रधानांना सांगितले, ज्यात शाली तयार करणे सोपे होते.