आगामी वर्षी क्रिकेटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार असून यंदाचे यजमान पद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये जाऊन सामने खेळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये खेळाडूंना पाठवण्यास तयार नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे पीसीबीकडून मात्र बीसीसीआयला मनवण्याचे हरएक प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता पीसीबीने बीसीसीआयला आणखी एक प्रस्ताव दिला आहे.
पीसीबीने बीसीसीआयशी संपर्क साधला असून पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारताला सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये राहण्याची इच्छा नसल्यास भारतीय संघाला सामने खेळून झाल्यानंतर नवी दिल्ली किंवा चंदिगडला परत जाण्याची परवानगी देण्यात येईल. पीसीबीने बीसीसीआयला सध्या मौखिक असे सुचवले आहे की, भारतीय संघ नवी दिल्ली किंवा चंदीगड/मोहाली यापैकी एका ठिकाणी त्यांचा कॅम्प लावू शकतो. शिवाय त्यांच्या सामन्यांसाठी लाहोरला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइट वापरू शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान होणार आहे. ज्याचे सामने लाहोर, रावळपिंडी आणि कराची येथे होणार आहेत. भारतीय सीमेच्या जवळ असल्यामुळे आणि लॉजिस्टिक सुलभतेमुळे, पीसीबीने लाहोरमध्ये भारताच्या सामन्यांचे नियोजन केले आहे. स्पर्धेतील भारताचे तीन गट- स्तरीय सामने २० फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध, २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध आणि २ मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहेत.
हे ही वाचा..
शुटरच्या फोनमध्ये झीशान सिद्दीकीचा फोटो सापडला
…म्हणून केले सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन
ठाकरे गट, काँग्रेस वादावर संजय राऊतांची सारवासारव; वैयक्तिक टीका न केल्याचे वक्तव्य
विमानांना धमकीसत्र सुरूच; एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा विमानांना बॉम्बची धमकी
आयसीसी या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलचा विचार करत आहे. या अंतर्गत स्पर्धेचे काही सामने पाकिस्तानच्या बाहेर खेळवले जातील. जेणेकरून भारताला या स्पर्धेत सहभागी होता येईल. सुरक्षेच्या कारणास्तव भारताकडून अद्याप पाकिस्तानमध्ये जाण्यास हिरवा सिग्नल देण्यात आलेला नाही. दरम्यान, आयसीसी सामने आयोजित करण्यासाठी दुबई आणि श्रीलंका यासारख्या पर्यायी ठिकाणांचा शोध घेत आहे.