कोविड-१९ मुळे देशभरात सुरू झालेल्या लॉक डाऊनमुळे चाणक्यचे प्रयोग बंद होते. लॉकडाऊननंतर प्रथमच चाणक्यचा पहीला शो विलेपार्लेच्या दिनानाथ नाट्यगृहात होतो आहे. प्रजासत्ताक दिनी रात्रौ ८ वाजता दिनानाथमध्ये पुन्हा एकदा चाणक्य अखंड भारताची गर्जना करेल अशी माहीती चाणक्यचे मुख्य अभिनेते मनोज जोशी यांनी दिली आहे.
हिंदी, गुजराती आणि मराठी सिनेमामध्ये अत्यंत व्यस्त असून सुद्धा मनोज जोशी यांनी देशभरात चाणक्यचे प्रयोग सुरू ठेवले. गेली तीस वर्षे हा नाट्ययज्ञ धगधगता ठेवला. संसद भवनातही चाणक्यचा प्रयोग झाला. गेल्या तीस वर्षात ना चाणक्य नाटकाची क्रेझ कमी झाली, ना या नाटकातून दिल्या जाणा-या ज्वलंत राष्ट्रवादाच्या विचाराचे महत्व.
लॉक डाऊन नंतर प्रथमच मुंबईत चाणक्यचा प्रयोग होणार आहे. लेखक मिहीर भूता यांच्या मूळ गुजराती नाटकावर बेतलेले हे नाटक हिंदी भाषेतून होते. मनोज जोशी नाटकात चाणक्यच्या प्रमुख भूमिकेत असतात. त्यांच्या व्यतिरिक्त अशोक बांठीया यांच्यासारखे नामवंत रंगकर्मी या नाटकात भूमिका करतात.
चंद्रप्रकाश यांच्या गाजलेल्या चाणक्य या मालिकेत मनोज जोशी यांनी मगध सम्राट धनानंदचा मंत्री श्रीयकाची भूमिका केली होती. त्यानंतर त्यांनी चाणक्य या विषयावर सखोल अभ्यास केला. देशात राष्ट्रवादाने भारलेल्या मजबूत मध्यवर्ती सत्तेचा विचार मांडणा-या आणि तो प्रत्यक्षात उतरवणा-या या महान मुत्सद्यावर बेतलेले चाणक्य त्यांनी तीस वर्षांपूर्वी रंगमंचावर आणले. आज देशात एकही असे राज्य नाही जिथे चाणक्यचा प्रयोग झालेला नाही. जम्मू-काश्मीर पासून केरळपर्यंत आणि आसाम पासून कच्छ पर्यंत भारताच्या कानाकोप-यात नाटकाचे यशस्वी प्रयोग झाले. दिनानाथमध्ये होणार-या प्रयोगाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.