उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा

वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती

उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात एका बोगद्याचे बांधकाम सुरू असताना बोगदा कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली होती. या बोगद्याच्या ढिगाऱ्याखाली ३६ मजूर अडकल्याची माहिती समोर आली आहे. 24 तासांनंतरही अडकलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात येत असून सध्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे.

बोगद्यात ३६ कामगार अडकले आहेत. कामगारांना वाचवण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते. अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. कामगारांनी आपण सुरक्षित असल्याचे सांगितलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “SDRF, NDRF आणि राज्य प्रशासनाचे पथक उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहेत.” तसेच स्वतः बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हे ही वाचा.. 

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आठ संघ झाले पात्र

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बोगद्याच्या बांधकामादरम्यान आलेल्या ढिगाऱ्यांमुळे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची स्थिती, मदत आणि बचावकार्य याबाबत फोनद्वारे सविस्तर माहिती घेतल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या बचावकार्याची सविस्तर माहिती पंतप्रधानांना देण्यात आली आणि परिस्थितीची माहिती देण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधानांनी यासंबंधित सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिले आहे. केंद्रीय एजन्सींना भारत सरकारने मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली आहे.

Exit mobile version