‘गो फर्स्ट’च्या वैमानिकांची एअर इंडिया, इंडिगोच्या ‘कॉकपिट’वर नजर

नोकरीची समस्या निर्माण झाल्यामुळे आता अन्य विमान कंपन्यांकडे अर्ज

‘गो फर्स्ट’च्या वैमानिकांची एअर इंडिया, इंडिगोच्या ‘कॉकपिट’वर नजर

दिवाळखोरीचा अर्ज केलेल्या ‘गो फर्स्ट’ हवाई वाहतूक विमान कंपनीचे शेकडो वैमानिक आणि कर्मचारी इंडिगो, एअर इंडिया आणि इतर काही एअरलाइन्समध्ये नोकऱ्या मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

किंगफिशर आणि जेट एअरवेजसारख्या मोठमोठ्या कंपन्यांच्या मागील अनुभवाचा विचार करता, सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांचा ताफा असणारी ‘गो फर्स्ट’ कंपनी केव्हा, किती विमानांसह आणि किती काळासाठी उड्डाण सुरू करेल, याची कोणतीही खात्री नाही.

‘गो फर्स्ट कंपनीला आर्थिक निधीची चणचण आहे. कंपनीला त्यांचा तोटा कधी कमी करायचा, हे माहीत आहे. त्यांची किंगफिशरच्या विजय मल्ल्यांसारखी परिस्थिती नाही. त्यामुळे जर त्यांनी २० ते २५ विमानांसह पुन्हा हवाईसेवा सुरू केली, तर कंपनीला इतक्या लोकांची गरज भासणार नाही. कोविडकाळापासूनच त्यांनी लोकांना बिनपगारी रजेवर पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आमच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे आम्हालाच माहीत नाही,’ असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

अजित पवार भाजपाच्या वाटेवर, संजय राऊतांचे ‘सामना’मधून टीकास्त्र

पिंपरी, औंध परिसरातील बिल्डर आयकर विभागाच्या जाळ्यात

पोलिसांकडून बळाचा वापर; पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट

राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती!

येथे दीर्घकाळापासून काम करणारा वरिष्ठ कर्मचारी म्हणाला, ‘आम्हाला आमचा मार्चचा पगार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मिळाला. आता एप्रिलचा पगार कधी मिळेल, हे कोणालाच माहीत नाही. अनेक वर्षांपासून येथे काम करणाऱ्यांना ग्रॅच्युइटीचीही चिंता सतावत आहे.’ त्यामुळेच इंडिगो आणि एअर इंडियासारख्या विमान कंपन्यांकडे ‘गो फर्स्ट’च्या कर्मचाऱ्यांकडून नोकरीचे भरपूर अर्ज आले आहेत. यात कॅप्टनपासून ट्रेनी फर्स्ट ऑफिसर्सपर्यंत जवळपास ७४० वैमानिकांचा समावेश आहे.

‘शेकडो वैमानिक आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. ते त्यांच्या भविष्याबद्दल चिंतेत आहेत,’ असे एका मोठ्या एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version