पायलटने चक्क मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले, चौकशी सुरू

नागरी हवाई उड्डाण महासंचलाकांच्या अहवालात मुद्दा

पायलटने चक्क मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले, चौकशी सुरू

विमानांमध्ये होत असलेल्या गोंधळाच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात आपण ऐकत आलो आहोत. एअर इंडियाच्या विमानातील पायलटने चक्क कॉकपिटमध्ये आपल्या एका मैत्रिणीला बोलावल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे.

दुबई ते दिल्ली जाणाऱ्या विमानात ही घटना घडली. २७ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेमुळे नियमांचा भंग झाल्याचे नागरी हवाई उड्डाण महासंचालकांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचेही महासंचालकांनी सांगितले. या पायलटला निलंबित करण्यात आले आहे अथवा नाही, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

या महिन्याच्या १८ तारखेला एअर इंडियाचे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले होते. खिडकीच्या काचेला तडा गेल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. हे विमान उतरविण्यात कोणतीही अडचण आली नाही. हे विमान पुण्याहून निघाले होते.

हे ही वाचा:

टीका भोवली.. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मविआचे रंगबदलू ‘रॅपर’

मानवाला अंतराळात नेण्याची एलन मस्क यांची अधुरी एक कहाणी

‘रॉन्ग साईड ड्रायव्हिंग’ करणाऱ्यांना रेड सिग्नल

त्याच दिवशी श्रीनगरला जाणाऱ्या स्पाइस जेट विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर उतरविण्यात आले. चुकीचा इशारा दिल्यामुळे विमान तातडीने उतरवावे लागले होते. गेल्या आठवड्यात महासंचालकांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, मार्च महिन्यात ३४७ प्रवाशांनी तक्रारी केल्या त्यात विमानातील समस्या आणि सामानाच्या तक्रारींची संख्या अधिक आहे.

विमान नियमनाच्या मते ३८.६ टक्के तक्रारी या विमानातील सुविधांसंदर्भात असून २२.२ टक्के तक्रारी या सामानासंदर्भात आहे. पैसे परत करण्यासंदर्भातील समस्या या ११.५ टक्के आहेत. महासंचालकांच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यात पैसे परत करण्याच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या वागणुकीसंदर्भात बरीच सुधारणा झाली आहे. याआधी पैसे परत करण्याबाबतच्या तक्रारींचे प्रमाण २३.७ टक्के इतके होते ते आता ११.५ टक्के झाले आहे. विमानातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीसंदर्भातील तक्रारींचे प्रमाण जानेवारील ८.९ टक्के होते ते आता ४ टक्क्यांवर आले आहे.

Exit mobile version