राजे महालात येरझाऱ्या घालत होते…त्यांच्या मनाची घालमेल लपत नव्हती…कसल्या तरी विचारात गढले होते…मुठी आवळल्या होत्या…कपाळावर घर्मबिंदू चमकू लागले होते… प्रधानांनी हे पाहिलं आणि संधी पाहून अदबीनं विचारलं…महाराज, चिंतेचं काय कारण?
प्रधानांचं हे बोलणं ऐकूनही राजे थांबण्याचं नाव घेत नव्हते. शेवटी भानावर येत म्हणाले, कालच्या एका घटनेमुळे मन लागत नाहीए. प्रधान म्हणाले, काल तर छान झाला की कार्यक्रम. तुम्ही मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला, मेट्रो मार्गी लागली. सगळ्यांनी कार्यक्रमाला छान प्रसिद्धी दिली. बरं, तुम्ही बरेच दिवसांनी बाहेर पडल्यामुळं तुम्हाला पाहायला गर्दीही भरपूर जमली होती. (प्रधानांनी जीभ चावली)
राजेंनी तिखट कटाक्ष टाकत शब्दबाण सोडला…ती गर्दी मला पाहायला जमली नव्हती, प्रधानजी. किंबहुना, ती गर्दी नव्हतीच. तो जनसागर होता. पण ते माझ्या चिंतेचं कारण नाही. काल ‘ते’ काकांना का भेटायला गेले याची चिंता मला राहून राहून सतावते आहे. ‘त्यांचं’ तर आम्ही कार्यक्रमाच्या जाहिरातीत नावंही टाकलं नव्हतं. पण नाव नाही बघून ‘ते’ काकांना भेटायला जातील असं वाटलं नव्हतं. कदाचित उद्घाटनाला बोलावलं असतं तर ती भेटच झाली नसती. चुकलंच आमचं.
प्रधान थोडा विचार करून म्हणाले, ते होय. त्यात काय एवढं गेले असतील तब्येतीची चौकशी करायला. आपणही जाऊया की. तुम्ही सांगा वेळ कधी निघायचं ते.
राजे म्हणाले, ते तर जाऊच आणि आता किंबहुना जायलाच हवं. पण त्याचे प्रसिद्ध झालेले फोटो दिसू लागल्याने ‘पहाटे’च जाग आली. अंगाला घाम फुटला होता. मग तडक टीव्ही लावला. काही दिसतंय का पाहू लागलो. पण कुठेच काही नव्हतं. मात्र विश्वास बसत नव्हता. पुन्हा शपथ वगैरे…
प्रधान हसत म्हणाले, एवढंच ना. कशाला काळजी करताय. गेल्या काही दिवसांत आलेल्या वेगवेगळ्या चाचण्यांत तुम्हीच ‘बेस्ट’ आहात हे सिद्ध झालंय. मला तर असंही कळलंय की, प्रजेमध्ये तुमची एवढी क्रेझ आहे ना, की त्यांच्या रक्त चाचण्यांतूनही तुम्हीच बेस्ट असल्याचं आढळलं आहे. एवढे तुम्ही नसनसात भिनला आहात, प्रजेच्या.
राजे आश्चर्यमिश्रित हसले. पुन्हा विचारात गढले.
प्रधानांनी पुन्हा त्यांना आश्वस्त करण्यासाठी बोलायला सुरुवात केली. म्हणाले, आता तर तुम्ही काळजीच करायची नाही. राज्य वगैरेची चिंता आता सोडा आणि देशाची चिंता करायला लागा.
राजे प्रधानांकडे पाहात म्हणाले, म्हणजे?
अहो, परवा मी वेगवेगळ्या भाषांत आपल्या कर्तृत्वाबद्दल भरभरून लिहिले. सगळ्यांना ते खूप आवडलेही आहे आणि तुमच्याकडे आता नवा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
कसला पर्याय? – इति राजे
अहो, तुम्ही देशाचे पंतप्रधान होणार आता.
काय म्हणताय काय? ते कसं काय? – राजे
प्रधान स्वतःवरच खुश होत म्हणाले, अहो, मी तुमचं भवितव्यच त्यात लिहिलंय. तुम्हीच आता देशाचे पंतप्रधान होणार म्हणून. ती क्षमता असलेला एक माणूस सध्या देशात आहे तो म्हणजे तुम्ही.
राजेंच्या चेहऱ्यावरची चिंता मिटली. सुटकेचा निश्वास सोडल्याप्रमाणे म्हणाले, खूप चांगले काम केलेत. कोमट पाणी घेऊन या प्यायला. आता बरे वाटेल मला.
मविआ
(अर्थात, महेश विचारे आपला)