पुणे जिल्ह्यातील पाचघर गावातील तुकाराम गायकर हा शेतकरी टोमॅटो विकून एका महिन्यातच कोट्यधीश बनला आहे. शुक्रवारी गायकर यांना एक कॅरेट टोमॅटोसाठी (२० किलो) २१०० रुपये भाव मिळाला. गायकर यांनी एकूण ९०० किलो क्रेटची विक्री केली. त्यातून एका दिवसातच त्यांना १८ लाख रुपये मिळाले. गेल्या महिन्यात टोमॅटोच्या गुणवत्तेनुसार त्यांना प्रति क्रेट एक हजार ते २४०० रुपये मिळाले होते.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात काळी माती असून पाणीही भरपूर मिळत असल्याने येथे कांदा आणि टोमॅटोचे चांगले पीक येते. तुकाराम गायकर यांच्याकडे १८ एकर जमीन आहे. यावेळी त्यांनी १२ एकर जमिनीवर टोमॅटोची शेती केली होती. त्यांनी त्यांच्या शेतीत १००हून अधिक महिलांना रोजगार दिला. त्यांची सून सोनाली टोमॅटोच्या बागेची देखभाल, टोमॅटो काढणे, ते टोपल्यांत भरणे आदी काम करते. तर, त्यांचा मुलगा ईश्वर विक्रीची जबाबदारी सांभाळतो.
गायकर कुटुंबाने गेल्या महिन्यापासून आतापर्यंत १३ हजार कॅरेट टोमॅटोची विक्री करून सव्वा कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत. जुन्नरमध्ये गायकर यांच्यासारखे १० ते १२ शेतकरी असून ते टोमॅटो विकून करोडपती झाले आहेत. बाजार समितीने एका महिन्यात ८० कोटींचा व्यवहार केला आहे.
हे ही वाचा:
भारतात पोहोचताच पंतप्रधानांनी घेतला दिल्लीच्या पूरस्थितीचा आढावा
पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यात रुपया ठरला खणखणीत…
बांद्रा बँडस्टँड येथे भरतीच्या लाटेने नेले महिलेला ओढून
ज्ञानव्यापी मशिदीतील कार्बन डेटिंगप्रकरणी २१ जुलै रोजी निर्णय
सुनील शेट्टींच्या विधानावर सदाभाऊ भडकले
अभिनेता सुनील शेट्टीच्या विधानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने मी टोमॅटो खाणे कमी केले आहे. टोमॅटोच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम त्यांच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे, असे म्हटले आहे. त्यावर शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘चित्रपट कलाकारांना सर्वसामान्यांशी काहीही देणेघेणे नसते. ते एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेतात, मात्र १०-१२ वर्षांतून एकदा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला की, त्यांच्या पोटात दुखतं,’ अशी प्रतिक्रिया खोत यांनी दिली.