वलसाडमधील मुन्नावर शेख यांच्याकडे असलेल्या दोन पर्शियन मांजरींपैकी एका मांजरीचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसरी मांजर मृत मांजरीला जिथे पुरून ठेवले होते तिथे २३ सप्टेंबर पासून म्हणजेच दुसऱ्या मांजराच्या मृत्युच्या दिवसापासून तिथे कितीतरी वेळ बसून आहे. शेख यांच्याकडे लिओ आणि कोको अशा दोन पर्शियन मांजरी होत्या. त्यातील कोको मांजरीचा मृत्यू झाला आणि आश्चर्य म्हणजे लिओ ही तासनतास कोकोच्या थडग्याजवळ बसून आहे.
लिओ एकाच जागी बसून असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर अनेक उत्साही लोकांनी शेख यांच्या घराला भेट दिली. सध्या शेख कुटुंबीय लिओची काळजी घेत असून तिला बसलेल्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. कोकोला घराच्या परिसरातच पुरण्यात आले आहे. मात्र, ज्या प्रकारे लिओ तासनतास तिथे बसून आहे त्यामुळे आम्हीही चकित झाल्याचे मुन्नावर यांचा मुलगा फैसल यांनी सांगितले. पर्शियन प्रकारची ही दोन भावंडे फैसल यांना वाढदिवसाला भेट म्हणून चार वर्षांपूर्वी एका मित्राने दिली होती. त्यावेळी ती अगदीच लहान पिल्ले होती.
हे ही वाचा:
आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!
‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल
लिओ ही पांढऱ्या रंगाची आहे तर कोको ही काळ्या रंगाची होती. मात्र, अडीच वर्षांपूर्वी कोको ही शेख यांच्या घराच्या बाहेर खेळत असताना अचानक हरवली होती. तेव्हा कोको चोरीला गेला असेल, असा अंदाज शेख कुटुंबीयांनी बांधला होता. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी एका कुटुंबीयाकडे कोको असल्याची माहिती शेख कुटुंबाला मिळाली. मात्र, कोकोला परत करण्यास त्या कुटुंबाने नकार दिला तेव्हा शेख कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने कोकोला परत मिळवले होते. तो पर्यंत कोकोला आजार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दोन वर्षांच्या दुराव्यानंतरही दोन्ही भावंडांमधील प्रेम तसेच होते. कोकोचा मृत्यू आजारपणामुळे झाला. तिच्या आजारावर अनेक ठिकाणी उपचार करण्याचे प्रयत्न केले, पण तरीही कोकोला वाचवू शकलो नाही, असे फैसल यांनी ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले. कोकोच्या मृत्यूबद्दल आणि तिला पुरलेल्या जागेबद्दल लिओला काहीच कल्पना नव्हती तरीही काहीतरी वाईट घडलंय या अंदाजाने लिओ त्या थडग्याजवळ बसली, असेही फैसल यांनी सांगितले.