मुंबईत दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यात प्रामुख्याने गटारात आढळणारा ‘ई- कोलाय’सह कोलिफोर्म हा जिवाणू त्या पाण्यात आढळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना काळात दादर, माहीम आणि धारावी या ‘जी उत्तर’ प्रभागात सर्वाधिक दूषित पाणी आढळले आहे. मुलुंडचा ‘टी’ प्रभाग तसेच माटुंगा शीवचा समावेश असलेल्या ‘एफ उत्तर’ प्रभागातही दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे.
महापालिकेने २०२०- २१ चा पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल महासभेत सादर केला आहे. या अहवालानुसार संपूर्ण मुंबईतील दूषित पाण्याचे प्रमाण ०.७ टक्क्यांवरून वाढ होऊन ०.९ टक्के इतके झाले आहे. मुंबईतील ‘जी उत्तर’ प्रभागात १०० पैकी ३.४ नमुने दूषित आढळले आहेत. यापूर्वी हे प्रमाण १.५ टक्के होते. दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक वाढ ही ‘एफ उत्तर’ प्रभागात आढळून आली आहे. या भागात पूर्वी ०.१ टक्के दूषित पाण्याचे नमुने आढळले होते. मात्र, २०२०- २१ च्या अहवालानुसार हे प्रमाण २.२ टक्क्यांवर पोहचले आहे. मुलुंडच्या ‘टी’ प्रभागातील दूषित पाण्याच्या नमुन्यांचे प्रमाण ०.२ टक्के होते, ते आता २.३ टक्क्यांवर पोहचले आहे.
हे ही वाचा:
विराट कोहलीने केले होते रोहित शर्माला डावलण्याचे प्रयत्न
विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!
तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी
सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर
वांद्रे पूर्व भागात दूषित पाणी आढळलेले नाही. वांद्रे, सांताक्रूझ पूर्व या ‘एच पूर्व’ भागातही दूषित पाण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. ‘आर उत्तर’ दहिसर भागातही दूषित पाणी आढळलेले नाही. कांदिवली ‘आर दक्षिण’ येथे ०.१ टक्के नामुन्यांमध्ये दूषित पाणी आढळले आहे.
महापालिकेच्या जलाशयातील दूषित पाण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. २०१९- २० या वर्षात दूषित पाण्याचे प्रमाण ०.६ टक्के होते. हेच प्रमाण २०२०- २१ मध्ये ०.३ टक्क्यांवर आले आहे. ‘ई कोलाय’ या जिवाणूमुळे गॅस्ट्रो सारखे आजार होत असतात. दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्यास गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येतही वाढ होऊ शकते.
महापालिका संपूर्ण मुंबईतील २००- २५० ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांची रोजच्या रोज तपसणी करत असते. हा अहवाल २४ तासांमध्ये तयार होते. ज्या भागात दूषित पाणी आढळते त्या भागांबद्दल आरोग्य विभागाला आणि पाणी खात्याच्या गळती शोध विभागाला तत्काळ ई- मेलद्वारे माहिती दिली जाते. जेणेकरून आरोग्याच्या दृष्टीने तपसणी करून आणि गळती शोधून दूषित पाण्याचा पुरवठा बंद करण्याचे काम युद्धपातळीवर केले जाते.