गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला असताना चाकरमान्यांनी आता कोकणाची वाट धरली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई- पुण्याहून मोठ्या संख्येने लोक कोकणात आपल्या गावी दरवर्षी जात असतात. काल (७ सप्टेंबर) दुपारपर्यंत तब्बल सहा विशेष रेल्वेगाड्या आणि नियमित पाच रेल्वे गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या. या गाड्यांमधून हजारोच्या संख्येने चाकरमानी गावोगावी दाखल झाले. चेकपोस्ट, स्थानकावर कोरोना चाचणी सक्तीची नसली तरी नोंदणी प्रक्रियेला वेळ लागत असल्याने या चाकरमान्यांना काही काळ प्रतिक्षा करावी लागली. कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात नोंदणीच्यावेळी लोकांची गर्दी झाली होती.
मागच्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे चाकरमान्यांना कोकणात जाता आले नव्हते. यावर्षी निर्बंध काही प्रमाणात शिथिल असल्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. चाकरमान्यांच्या आगमनामुळे गावे गजबजली असून बाजारपेठांमध्येही उलाढाल वाढली आहे. शुक्रवारपर्यंत पाच लाख चाकरमानी जिल्ह्यात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा:
शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!
शरद पवारांचा ‘हा’ कांगावा आता फोल ठरणार
चोरट्यांकडे एक गाडी, आठ लॅपटॉप
सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार
रेल्वेने १५० विशेष गाड्या सोडल्या आहेत. तसेच रोज सरासरी २० ते २५ एसटी बसेसच्या माध्यमातूनही चाकरमानी जिल्ह्यात येऊ लागले आहेत. मुंबईहून सिंधुदुर्गात येण्यासाठी सुमारे २०० बसेसचे आरक्षण झाले आहे. गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात रोज १२ विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. रोजच्या विशेष गाड्यांसोबतच रेल्वेच्या नियमित गाड्याही धावणार असल्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर ताण आला आहे. कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी असल्यामुळे या ताणाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मंगळवारी सर्वच गाड्या दोन ते अडीच तास विलंबाने धावत होत्या.