कोरोनाच्या प्रभावामुळे गेली दोन वर्षे निर्बंधनात गेलेल्या दिवाळीच्या उत्साहाला यंदा मोकळीक मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये आता ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. बाजारात रंगीबेरंगी कंदिल दिसू लागताच, वातावरणाचा नूर खरंच पालटतो. नानाविध पदार्थांची रेलचेल तर दिवाळीत असतेच. शिवाय वातावरणात उटण्याचा वासही दरवळू लागतो. घरोघरी पदार्थांचा घमघमाट तर असतोच, त्याच जोडीला खरेदीची झुंबड. दिवाळी म्हटलं की, सर्वाधिक आकर्षण असतं ते कंदिलांच घराच्या दरवाजावरील लावलेला कंदिलाचा पसरलेला उजेड एक आगळी सकारात्मक ऊर्जा देतो.
दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारातील दुकाने, गल्ल्या विविध आकारांच्या, रंगाच्या, विविध धाटणीच्या कंदिलांनी फुलल्या आहेत. सध्याच्या घडीला बाजारात कागदापासून आणि कापडापासून बनवलेल्या कंदिलांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आह़े.
हे ही वाचा:
आता परदेशात उशीरा पोहोचणार फराळ
गुरुग्राममध्ये रस्त्यावरील नमाजावरून राडे
त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळली नाही
उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ
कंदिलासाठी माहीमची कंदील गल्ली पटकन डोळ्यासमोर येते. अगदी माटुंगा रोड रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला आलात की, लेडी जमशेदजी रोडवर, गोपीटँक मार्केटसमोरचे फूटपाथ विविधरंगी, विविधढंगी कंदिलांच्या लख्ख उजेडाने परिसर व्यापून टाकतात. माहीम येथील या कंदील गल्लीत गेली अनेक वर्षे कंदिलांचे नाना प्रकार विक्रीस आलेले पाहायला मिळतात. रात्रीच्या वेळी तर येथे खरेदीसाठी एकच झुंबड उडालेली असत़े दरवर्षी येथे कंदिलांचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात़ या नवनवीन आकारांसोबत अगदी ४ ते ५ फुटांपर्यंत मोठे कापडी कंदीलही येथे विक्रीसाठी ठेवलेले असतात़ हाताने तयार केलेल्या या कंदिलांसाठी कागदाबरोबरच कापडाचाही वापर केलेला असतो. या इकोफ्रेंडली कंदिलामध्ये साडी आणि पेपरचा वापर करून, आकर्षक आकाशकंदील तयार करण्यात आले आहेत.
घरासमोरील विविध रोषणाईसाठी लावण्यात येणा-या तोरणांसाठी तसेच विविध विजेवरील साहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लोहार चाळीतही इलेक्ट्रिक कंदिलांचे नवनवीन प्रकार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत़ हल्ली लहान-लहान कंदिलांची माळ लावण्यालाही अधिक प्राधान्य आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेप्रमाणेच ऑनलाईन कंपन्यांचे मार्केट मात्र सध्या भलतेच तेजीत असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच योजना, सवलती आणि घरपोच सेवेमुळे या क्षेत्राचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. सण-उत्सवाच्या काळात ऑनलाईन बाजारपेठेची उलाढाल कोटय़वधींच्या घरात जाते.