आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर उतरण्याची गरज असते. एकदा का त्यांनी मनात आणले तर तो परिसर अगदी कमी वेळेत आकर्षण बनू शकतो. पालघरमध्ये स्थानिकांनी अशीच कमाल केली.
पालघरमधील केळवे समुद्रकिनाऱ्याची नैसर्गिक विविधता जपण्यासाठी स्थानिक लोकांनी पुढाकार घेतला आहे. ‘चला झाडे लावू आणि आपल्या निसर्गाला आपल्यासाठी वाचवू’ या नाऱ्याने शुक्रवारी वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली. दांडेकर कॉलेजचे विद्यार्थी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि स्थानिक लोक असे मिळून साधारण ४०० पेक्षा अधिक लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.
झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी केळवे एन्व्हायर्नमेंटल कन्झरवेशन बोर्डने घेतली आहे. झाड दान करणाऱ्या व्यक्तीचे नाव झाडाच्या खोडावर चिकटवले जाणार आहे. या मोहिमेत साधारण १,३०० झाडे लावली जाणार असून पुढील आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती एका स्वयंसेवकाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोनोकारवसची (समुद्र शेवाळचा प्रकार) लागवड केली जाणार आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून आपल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणीसाठी किंवा त्यांच्या वाढदिवसाला भेट देण्यासाठी म्हणून एखादे झाड दत्तक घेता येऊ शकते. जागे अभावी झाडं लावता येत नसेल तर या मोहिमेतून झाड दत्तक घेता येऊ शकते आणि निसर्गाला परतफेड करू शकतो, अशी मोहिमेची उद्दिष्टे आहेत.
हे ही वाचा:
लाख लाख ‘सोनेरी’ तेजाची सारी दुनिया
८ वाजता मुख्यमंत्र्यांचा लाईव्ह संवाद! काय नवीन जबाबदारी टाकणार?
भंडाऱ्या पाठोपाठ आणखी एक जिल्हा कोरोनामुक्तीकडे
नार्कोटिक्स अधिकाऱ्यांवरच त्याने केला हल्ला आणि…
केळवे समुद्र किनाऱ्याची नैसर्गिक विविधता जपण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे असे एन्व्हायर्नमेंटल कन्झरवेशन बोर्डचे सदस्य असलेल्या प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत केळवे समुद्रकिनारी वादळामुळे अनेक झाडांचे नुकसान झाले होते त्यामुळे या मोहिमेअंतर्गत आम्ही एका झाडासाठी ५०० रुपये जमा करत आहोत असेही त्यांनी सांगितले. झाड दत्तक घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे असे एका स्थानिकाने सांगितले. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील केळवे हे एक पालघर जिल्ह्यातील लहान गाव असून ते विविध झाडांनी वेढेलेले आहे. २०१७ मध्ये आलेल्या चक्रीवादळाचा तडाखा या गावाला बसला होता.