गणेशोत्सव तोंडावर असताना यंदा रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे. पुरेशी खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविकांचे लक्ष असताना कोरोना चाचणीच्या अहवालाची अट कोकणात येणाऱ्यांसमोर स्थानिक प्रशासनाने ठेवल्यामुळे आता चाकरमान्यांनी खासगी लॅबमध्ये चाचणी संबंधित चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे आरोग्यमंत्र्यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांवर चाचणी किंवा लसीकरणाची अट घालणे शक्य नसल्याचे म्हटले असले, तरी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात अटी जाहीर करण्यात आल्या आहेत.
कोकणात जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांनी बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसोबतच खबरदारीचा उपाय म्हणून खासगी लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांसाठी विचारणा सुरू केली आहे. हे अहवाल ७२ तासांपूर्वी हवे असल्याने त्यादृष्टीने वेळेचे नियोजन करून मिळेल का अशीही विचारपूस भाविकांकडून केली जात आहे. यंदा भाविकांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उत्साह आहे. मात्र सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने सामान्यांना संभ्रमात टाकू नये, प्रवासाबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा दरवर्षी गणेशोत्सवात कोकणामध्ये जाणाऱ्या दिनेश सावंत यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
भारताचे पुन्हा एकदा विक्रमी लसीकरण
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
अल्जेरियाच्या नौदलासोबत भारतीय नौदलाचा ऐतिहासिक संयुक्तसराव
सध्या रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी असल्यामुळे चाचण्यांना मिळणारा प्रतिसादही कमी होता. त्यामुळे खासगी लॅबमध्ये मोठ्या संख्येने चाचण्या केल्या जात नव्हत्या. अल्प दारामध्ये मिळणारे चाचणी संचही बाजारात आणण्यात आले, तरी त्यांचाही वापर मोठ्या प्रमाणात झाला नाही. मात्र आता पुन्हा कोकणात जाणाऱ्या नागरिकांकडून चाचणी संदर्भात चौकशी केली जात आहे. चाचणी अहवाल लवकर मिळण्यासंदर्भातही विचारणा केली जाते, असे दक्षिण मुंबईतील काही खासगी लॅब चालकांनी सांगितले.
गेले काही दिवसांपासून कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्या कमी आहे. पावसाळी आजारासंबंधीच्या चाचण्या करणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र आरटीपीसीआर करणाऱ्यांची संख्या कमी असली, तरीही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या लोकांचा या चाचण्या करण्याकडे कल असेल, असे अधिकृत पॅथालॉजी संघटनेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.