नवी मुंबईमधील गोठवली गाव येथील स्वर्गीय राजीव गांधी उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू असून या तलावाच्या काठावर जवळपासच्या परिसरातील झोपडपट्टीत राहणारे नागरिक कपडे वाळत घातल्याचे चित्र आहे. स्मार्ट सिटीमधील या तलावाला धोबीघाटाचे रूप प्राप्त झाले आहे. नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही.
तलाव व्हिजन अंतर्गत नवी मुंबईतील तलावांवर कोट्यवधी रुपये खर्च करून तलावांना सुशोभित करण्यात आले आहे. या तलावांचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जातो. पालिकेकडून अशा वेळी हे कपडे जप्त करून ते जाळण्यात येतात. परंतु गोठवली गाव येथील राहणारे नागरिक तळ्याच्या परिसराचा वापर कपडे सुकवण्यासाठी करत असून वारंवार कारवाई करूनही त्यांच्या वागण्यात बदल होत नसल्यामुळे पालिकेच्या डोक्याला ताप झाला आहे.
हे ही वाचा:
इतिहासाची पुनरावृत्ती होणार; टाटांचे ते विमान पुन्हा झेप घेणार!
शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!
पालिकेकडून तलावाची स्वच्छता होत नसल्यामुळे तलावातील पाणी खराब झाले आहे. सुरक्षारक्षक तैनात नसल्यामुळे अनेकदा लहान मुले पोहण्यासाठी तलावात उतरतात. शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या तलावांचे सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेने २० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. मात्र, आता या तलावांची अवस्था दयनीय झाली आहे.
तलावाच्या ठिकाणी कोणीही कपडे धुवत असल्यास वा वाळवत असल्यास तेथील अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नवी मुंबई पालिकेला स्वच्छतेमध्ये मानांकन मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील तलावांचे विद्रुपीकरण करू नये, शहर अस्वच्छ करू नये, असे नवी मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.