बॉक्स ऑफिसवर ‘पावनखिंड’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट आता लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचं कथानक सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला. अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या चित्रपटाचं कौतुक केलं होत.
तिकीट खिडकीवर चांगली कमाई केल्यानंतर ‘पावनखिंड’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. २० मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर ‘पावनखिंड’ प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ओटीटीवर देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘पावनखिंड’ हा चित्रपट मराठा इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटनेवर आधारित असून यावर्षीचा मराठी इंडस्ट्रीसाठीचा सर्वात मोठा चित्रपट होता. हा चित्रपट फर्जंद आणि फतेशिकस्त नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवासावर आधारित चित्रपट मालिकांमधील तिसरा आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री
काश्मीर फाईल्स चित्रपटचे यश सामान्य नागरिकांचे
हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’
गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, अजिंक्य ननावरे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, आस्ताद काळे, माधवी निमकर, रुची सवर्ण, प्राजक्ता माळी, दीप्ती केतकर, क्षिती जोग आदी कलाकारांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.