योगगुरू बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद कंपनी आता नव्या वादात अडकली आहे. पतंजली आयुर्वेदच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये आरोप करण्यात आला आहे की, या ब्रँडची हर्बल टूथ पावडर ‘दिव्य मंजन’ ज्याची शाकाहारी म्हणून विक्री केली जाते, त्यात मांसाहारी घटक आहेत. शाकाहारी आणि वनस्पती-आधारित आयुर्वेदिक उत्पादन म्हणून जाहिरात केल्यामुळे ‘दिव्य मंजन’ दीर्घकाळ वापरल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. पण, हल्लीच्या संशोधनातून दिसून आले आहे की उत्पादनामध्ये माशांच्या अर्कापासून तयार होत असलेल्या ‘समुद्रफेन’ (सेपिया ऑफिशिनालिस) घटकाचा वापर होत आहे.
अधिवक्ता यतीन शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, पतंजलीच्या ‘दिव्य मंजन’च्या पॅकेजिंगवर हिरवा बिंदू आहे. हिरवा बिंदू म्हणजे उत्पादन शाकाहारी असल्याचे दाखवले जात आहे. मात्र, तरीही घटकांच्या यादीत स्पष्टपणे लिहिले आहे की टूथ पावडरमध्ये सेपिया ऑफिशिनालिस आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला आहे की, हे चुकीचे ब्रँडिंग केले जात असून औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. यतीन शर्मा यांनी म्हटले आहे की, हा खुलासा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्रासदायक आहे, कारण यामुळे त्यांच्या धार्मिक श्रद्धा दुखावल्या गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
पत्राचाळ प्रकरण: फडणवीसांचे नाव घेण्यासाठी दिली होती धमकी
केदारनाथमध्ये बिघडलेले हेलीकॉप्टर उचलून नेताना दोर तुटला आणि…
कानाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर महिला पोलिसाचा मृत्यू?
‘दिव्य मंजन’मध्ये समुद्रफेन हे प्राणी-आधारित उत्पादन वापरले जात असल्याचे रामदेव यांनी स्वतः युट्यूब व्हिडिओमध्ये कबूल केल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे. दिल्ली पोलिस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि आयुष मंत्रालयासह विविध सरकारी संस्थांकडे तक्रारी दाखल करूनही आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. या याचिकेत उत्पादनाच्या चुकीच्या लेबलिंगचे निराकरण करण्यासाठी आणि प्रतिवादींना जबाबदार धरण्यासाठी न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मांसाहारी पदार्थाचे अनवधानाने सेवन केल्यामुळे झालेल्या त्रासाची भरपाई याचिकाकर्त्यांनी मागितली आहे. याचिका घेतल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद, बाबा रामदेव, केंद्र सरकार आणि पतंजलीच्या दिव्या फार्मसीला नोटीस बजावत पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे म्हटले आहे.