दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणावरून पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पतंजली आयुर्वेदने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन माफी मागितलीही होती. मात्र, तरीही न्यायालयाने त्या जाहिरातिच्या आकारावरून जाब विचारत उत्पादनाच्या जाहिराती ज्या आकारात दिल्या त्या आकारात माफीच्या जाहिराती दिल्या का ? असा प्रश्न उपस्थित केला होता. पतंजलीकडून ६७ वृत्तपत्रांमध्ये माफीनामा प्रकाशित करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर योगगुरू रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी बुधवारी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये पतंजलीच्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी नव्याने माफी मागितली आहे. या वेळी, हा माफीनामा पूर्वीच्या माफीनाम्यापेक्षा अधिक ठळक आणि आकाराने मोठा आहे.
जाहिरातीमध्ये, रामदेव बाबा आणि बाळकृष्ण म्हणाले की, ते त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार तसेच पतंजली आयुर्वेदच्या वतीने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे/आदेशांचे पालन न केल्याबद्दल आणि अवज्ञासाठी बिनशर्त माफी मागत आहेत. आम्ही आमच्या जाहिराती प्रकाशित करताना झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत आणि अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची आम्ही काळजी घेत असून यासाठी मनापासून वचनबद्ध आहोत, असे माफीनाम्यात म्हटले आहे.
यापूर्वी दिशाभूल जाहिरात प्रकरणी कारवाईच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विचारले होते की, पतंजलीने वर्तमानपत्रांमध्ये दिलेला माफीचा आकार त्यांच्या उत्पादनांच्या पूर्ण-पानाच्या जाहिरातींसारखा आहे का? रामदेव आणि बाळकृष्ण यांनी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाला सांगितले होते की, त्यांनी सुमारे ६७ वर्तमानपत्रांमध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी जाहीर माफी मागितली होती. त्यांनी दावा केला की, या जाहिरातींची किंमत १० लाख रुपये आहे. न्यायालयाने पतंजलीला जाहिराती एकत्र करून खंडपीठासमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना आता मोठे करून आम्हाला देऊ नका. आम्हाला वास्तविक आकार पहायचा आहे. आम्हाला हे पहायचे आहे की तुम्ही जाहिरात जारी करता तेव्हा याचा अर्थ असा नाही की आम्ही ती मायक्रोस्कोपद्वारे पाहिली पाहिजे, असे न्यायालयाने सुनावले होते.
हे ही वाचा:
‘जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही’
भगवान रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री?
सिद्धरामय्या यांनी घेतली नगरसेवक हिरेमठ यांची भेट
कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याचा दावा; मुलीची हत्या ही ‘केरळ स्टोरी’ प्रमाणेचं!
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर २०२३ रोजी पतंजली आयुर्वेदला दिले होते. मात्र, त्यानंतरही या जाहिराती सुरू होत्या, असा आक्षेप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून (आयएमए) घेण्यात आला होता.