हैदराबादची पाच वर्षांची प्रतीक्षा अखेर शुक्रवारी संपुष्टात आली. सन २०१६च्या आयपीएल विजेत्या हैदराबादने शुक्रवारी राजस्थानला क्वालिफायर २मध्ये पराभूत करून अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. पॅट कमिन्सच्या हैदराबादच्या संघाने १७५चे लक्ष्य राजस्थानसमोर ठेवून हा सामना ३६ धावांनी जिंकला. आता रविवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअमवर रंगणाऱ्या अंतिम मुकाबल्यात त्यांचा सामना कोलकात्याशी होईल.
हैदराबादच्या विजयात सर्व खेळाडूंचा हातभार लागला. हेन्रिच क्लासेनचे अर्धशतक आणि अभिषेक शर्मा व शाहबाझ अहमद या दोन तरुणांची फिरकी गोलंदाजी याच्या जोरावर हैदराबादने अंतिम फेरीत धडक मारली. राजस्थानचा संघ गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर असूनही त्यांच्या पदरी निराशा आली. तर, कोलकात्याने अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात हैदराबादला पराभूत करून चेन्नईचे तिकीट काढले होते. आता हैदराबादला या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आहे.
शाहबाझ अहमद याने यशस्वी जयस्वाल, रियान पराग आणि आर. अश्विन यांसारख्या महत्त्वाच्या विकेट घेऊन विजयी खेळी केली. यशस्वीने २१ चेंडूंत ४२ धावा केल्या होत्या. तर, अभिषेक शर्मा याने संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटम्वर यांना बाद केले. तर, अनुभवी आर. अश्विन आणि युझुवेंद्र चहल या फिरकीपटूंना सूर गवसला नाही.
हैदराबादचे फिरकीपटू शाहबाझ आणि अभिषेक यांनी आठ षटकांत ४७ धावा देऊन चार विकेट घेतल्या असताना राजस्थानचे फिरकीपटू अश्विन आणि चहल यांनी आठ षटकांत ७७ धावा देऊन एकही विकेट घेण्यात अपयशी ठरले.
दिवसाच्या सुरुवातीला जेव्हा हैदराबादचा कर्णधार कमिन्स नाणेफेक हरला, तेव्हा तो नाखुष वाटला. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला. ट्रेव्हिस हेड फार काही करू शकला नाही. राहुल त्रिपाठीने आर. अश्विनच्या गोलंदाजीची पिसे काढली. राहुल त्रिपाठीने आर अश्विनच्या गोलंदाजीवर १८ धावा तडकावल्या. हैदराबादने चार षटकांत ४५ धावा केल्या.
हे ही वाचा:
अग्रवाल कुटुंबीयांनी चालकाचा फोन काढून घेतला, खोलीत डांबून ठेवले, जबाब देण्यासाठी धमकावले आणि….
अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास, कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय!
पोर्शे अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याने पुण्यातील दोन पोलिसांचे निलंबन!
‘नवीन पटनायक यांना व्हीके पांडियन यांनी ओलिस ठेवले आहे’
राजस्थनच्या ट्रेंट बोल्ट याने पाचव्या षटकात राहुल त्रिपाठीची विकेट घेतली. त्यानंतर युझुवेंद्र चहलही बाद झाला. त्रिपाठीने १५ चेंडूंत ३७ धावा चोपल्या. एडन मार्करमही एक धाव करून याच षटकात बाद झाला. बोल्टने पॉवरप्ले दरम्यान हैदराबादच्या तीन महत्त्वाच्या विकेट टिपल्या. ट्रेव्हिस हेड २८ चेंडूंत केवळ ३४ धावा करू शकल्या. संदीप शर्माने १०व्या षटकात त्याची विकेट घेतली. तेव्हा हैदराबादची अवस्था सहा बाद १२० अशी झाली होती. त्यानंतर आलेल्या आवेश खान याने नीतीश कुमार रेड्डी आणि अब्दुल सामाद यांची विकेट घेतली. तर, हेन्रीच क्लासेन याने ३३ चेंडूंत ५० धावा करून चांगली खेळी केली. त्याला शाहबाझ अहमद याची साथ मिळाली. त्याने १८ दावा केल्या. क्लासेनच्या ५० धावांमुळे हैदराबादला चांगली धावसंख्या उभारता आली.