काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी नैनिताल येथील आपल्या घरात आग लागल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्याद्वारे त्यांनी हेच हिंदुत्व आहे का, असा सवाल विचारत पुन्हा एकदा नव्या वादाची ठिणगी टाकली आहे.
सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या त्यांच्या वादग्रस्त पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली होती. त्यावरून देशभरात वादळ उठले.
आता त्यांच्या नैनिताल येथील घराला आग लागल्याच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा त्यांनी हिंदुत्वावर टिप्पणी केली आहे. ते आपल्या सोशल मीडियातील पोस्टमध्ये लिहितात की, ज्यांनी हे कृत्य केले आहे त्या माझ्या मित्रांसाठी हे दरवाजे मला उघडे ठेवायचे होते, पण हे हिंदुत्व नाही, असे माझे म्हणणे अजूनही चुकीचे ठरेल का?
खुर्शीद यांनी या ट्विटमध्ये आपल्या घरात लागलेल्या आगीचे छोटे व्हीडिओ टाकले आहेत. त्यात मुख्य दरवाजापाशी ही आग लागली असून तेथील कर्मचारी आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्या आगीमुळे दरवाजा जळला असून खिडक्यांची तावदाने फुटली आहेत.
हे ही वाचा:
युरोपात कोरोनाचा कहर, पण भारतात कोरोनाविरोधी कवच
एनसीबीची कारवाई; जळगावमधून ४९ पोती गांजा जप्त
गृहमंत्र्यांऐवजी मलिकांनीच घेतली पत्रकार परिषद
…म्हणे तीन राज्यांत निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्रात हिंसाचार
खुर्शीद यांच्या पुस्तकावर प्रचंड टीका झाली होती. भाजपानेही त्यांच्या या पुस्तकातील विधानावर टीका करत काँग्रेसकडून जातीय राजकारणाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मग हिंदुत्वावर टिप्पणी केल्यानंतर त्यावरही टीका झाली. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी मात्र खुर्शीद यांच्या या विधानावर टीका केली होती. त्यानंतर दिल्लीतील एका वकिलाने न्यायालयात खुर्शीद यांच्याविरोधात याचिका दाखल केली.