मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी किनारा मार्गाच्या बांधकामासाठी मरिन ड्राइव्हवरील पारशी गेट एप्रिल २०२१मध्ये हटवण्यात आले होते. मात्र किनारा मार्ग कार्यान्वित होण्यापूर्वीच पारशी गेट जानेवारी २०२४मध्ये पुन्हा स्थानापन्न होणार आहे. मात्र यावेळी आपल्या आधीच्या जागेपासून ७५ मीटर दूर अंतरावर बसवले जाणार आहे.
ह्युजेस रोड येथील रहिवासी असलेले रेयोमंद झरिवाला यांनी नुकतेच माहितीच्या अधिकारातून अर्ज करून पारशी गेट पुन्हा कधी उभारणार, अशी माहिती विचारली होती. जेणेकरून पारशी समुदाय या प्रवेशद्वारावर स्थित असलेल्या देवीची प्रार्थना करू शकेल, असे नमूद करण्यात आले होते.
हे ही वाचा:
भिवंडीतील तीन गोदामांना भीषण आग!
इस्रायलने जाहीर केले करा अथवा मरा! हमासविरोधातील लढाई दुसऱ्या टप्प्यांत
गाझामधील रुग्णालयच हमासच्या दहशतवादी कारवायांचे केंद्र
कोचीमध्ये ख्रिस्ती प्रार्थनासभेत स्फोट, एक व्यक्ती ठार
मरिन ड्राइव्हवरील पारशी गेटची पूजा पारशी झोरास्ट्रियन समाज गेल्या १०० वर्षांपासून करतो आहे. या प्रवेशद्वारावर या समाजाची जलदेवता ऍवा हिची प्रतिमा आहे. सागरी किनाऱ्यासाठी हे पारशी गेट सन २०२०मध्ये तात्पुरत्या स्वरूपात हटवण्यात आले होते. मात्र कोस्टल रोडचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे पारशी गेट मरिन ड्राइव्हवर मूळ जागी किंवा जवळपास पुन्हा उभारले जाईल, असे आश्वासन पालिकेतर्फे पारशी समाजाला देण्यात आले होते, अशी आठवण झरीवाला यांनी पत्रात पालिकेला करून दिली आहे. या प्रवेशद्वारावरील पारशी देवता ऍवा ही जलदेवता असल्याने पारशी समाजाने हे गेट पाण्याजवळच असावे, अशी मागणी केली होती.
याबाबत किनारा मार्ग प्रकल्पाचे महापालिकेचे मुख्य इंजिनीअर मंताया स्वामी यांना विचारले असता, त्यांनीही हे गेट हलवण्याची परवानगी वारसास्थळ समितीकडून मिळाली असल्याचे सांगितले. जानेवारीपर्यंत हे गेट आम्ही पुन्हा उभारू. पूर्वी हे गेट चर्नी रोड येथील सावित्रीबाई फुले मुलांच्या वसतिगृहासमोर होते. मात्र आता ते या जागेपासून ७५ मीटर दूर उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले. हे पारशी गेट येथे पुन्हा उभारण्यासाठी संवर्धन वास्तूविशारद राहुल चेंबुरकर यांची निवड करण्यात आली आहे.