संसद भवनाची सुरक्षा भेदल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन केले जाईल आणि प्रवेशद्वारावर बॉडी स्कॅनर बसवले जातील, असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षनेत्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संसद भवनाच्या सुरक्षेचा भंग झाल्यानंतर, सभापती ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली आणि संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल, असे सांगितले.
ओम बिर्ला यांनी गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवांना पत्र लिहून सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच, संसद भवनाच्या विविध प्रवेशद्वारांवरील सुरक्षाव्यवस्था आणखी कडेकोट केली जाईल, ठिकठिकाणी संपूर्ण शरीराची तपासणी करणारे ‘बॉडी स्कॅनर’ बसवले जातील, असेही सांगण्यात आले.
बुधवारी संसदेत दोन तरुणांनी घुसखोरी करून प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उडी मारली होती. तसेच, पिवळ्या रंगाच्या धुराची नळकांडी फोडली होती. तसेच, घोषणाबाजीही केली. त्यांना खासदारांनी चोप देऊन पकडले. मात्र या घटनेने संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सध्या संसदेत प्रवेश करण्यासाठी तीन स्तरांमध्ये सुरक्षा तपासणी केली जाते. सीआरपीएफवर बाह्य वर्तुळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तर मुख्य इमारतीसाठी एक विशेष सुरक्षा पथक आहे. याशिवाय, दोन्ही सभागृहांचे स्वतःचे सुरक्षा संचालक आहेत. लोकसभेसाठी अभ्यागत पास मिळविण्यासाठी फॉर्मवर खासदाराची शिफारस स्वाक्षरी आवश्यक आहे. भेटीदरम्यान अभ्यागतांना त्यांचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागते. संसदेत प्रवेश केल्यावर, अभ्यागतांना सुरक्षेची तपासणी करावी लागते, त्यानंतर त्यांना फोटो ओळखपत्र बनवावे लागते. त्यांचे मोबाइल फोन रिसेप्शनमध्ये जमा केले जातात आणि त्यानंतर सुरक्षा कमांडोद्वारे त्यांना अभ्यागतांच्या गॅलरीत नेले जाते. त्यांना त्यांच्या पासवर नमूद केलेल्या कालावधीसाठी परिसरात राहण्याची परवानगी आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा प्रत्येक सत्रापूर्वी संयुक्तपणे सुरक्षेचा आढावा घेतात आणि सुरक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त पाऊल उचलणे आवश्यक असल्यास, संयुक्त सचिव त्यानुसार सुरक्षा शिफारसी देतात.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मोठा निर्णय
‘प्रेक्षक पाससाठी घुसखोर सातत्याने सेक्रेटरीच्या संपर्कात’
काश्मीर मध्ये धावणार वंदे भारत
संसदेतील घुसखोरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
संसदेच्या नवीन इमारतीच्या उभारणीसाठी सुरक्षा व्यवस्थेबाबत सहाहून अधिक बैठका झाल्या असून एकात्मिक सुरक्षा आराखडाही तयार करण्यात आला आहे.