मुंबईतील विलेपार्ल्यात गेली अनेक वर्ष पार्लेकरांना चविष्ट वडापाव खाऊ घालणाऱ्या बाबू वडापावचे मालक बाबूराव सीतापराव यांचे आज निधन झाले. रात्री २:४५ वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
बाबूराव सीतापराव हे वयाच्या बाराव्या वर्षी कोकणतून मुंबईत आले. त्यांनी पार्ल्याच्या जीवन रेस्टॉरंटमध्ये काम केले आहे. जीवनचे मालक जोगळेकर यांना पार्ले टिळक विद्यालयाच्या कँटीनच्या कामात सहकार्य करू लागले. पुढे बाबुरावांची त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि शाळेतील मुलांशी त्यांचे असलेले चांगले संबंध लक्षात घेऊन जोगळेकरांनी कँटीनची पूर्ण जवाबदारी बाबुरावांना दिली.
हे ही वाचा:
१९६० मध्ये त्यांनी ६ पैशाला एक वडा विकत बाबू वडापावची सुरवात केली. आज बाबू वडापाव हे नाव पार्ल्यात तर सर्वांना परिचीत आहेच पण त्याचबरोबर पार्ल्याबाहेरही बाबू वडापावची चव हे प्रसिद्ध आहे. पार्ले टिळक विद्यालयात गेली ६१ वर्ष मुलांना वडापाव आणि इतर खाद्यपदार्थ खाऊ घालण्याचं काम त्यांनी केलं. बाबू वडापाव हा प्रसिद्ध झालाच होता पण त्याचबरोबर बाबू वडापावने आणलेला पट्टी सामोसा हा देखील खूप प्रसिद्ध झाला. गेल्या ६१ वर्षांच्या प्रवासात बाबू वडापावच्या वडापावखेरीज पट्टी सामोसा, कोथिंबीर वाडी, मटार पॅटिस आणि नुकत्याच सुरु झालेल्या मिसळ पाव या सर्व पदार्थांनी पार्लेकरांच्या जिभेचे चोचले पुरवले आहेत.