टेबल टेनिसपटू श्रीजाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय महिला खेळाडू !

यापूर्वी मनिका बत्राने असा केला होता कारनामा

टेबल टेनिसपटू श्रीजाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय महिला खेळाडू !

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. भारताची महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला हिने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. श्रीजा अकुलाने टेबल टेनिसच्या राउंड ऑफ-१६ मध्ये प्रवेश केला आहे. श्रीजा अकुला ही उपउपांत्यपूर्व फेरी (प्री-क्वार्टर फायनल) गाठणारी भारताची दुसरी महिला खेळाडू बनली आहे. टेबल टेनिसपटू मनिका बत्राने यापूर्वी असा कारनामा केला होता.

श्रीजा अकुलाने राउंड ऑफ ३२ मध्ये सिंगापूरच्या जियान झेंगचा ४-२ असा पराभव केला. भारतीय खेळाडूने सिंगापूरच्या खेळाडूचा ९-११, १२-१०, ११-४, ११-५, १०-१२, १२-१० असा पराभव केला. ५१ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात भारताच्या श्रीजाने सिंगापूरच्या खेळाडूला पाणी पाजत विजय प्राप्त केला. हा सामना सहा सेट मध्ये चालला. पहिला सेट गमावल्यानंतर श्रीजाने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. दुस-या सेटमध्ये थोड्या चुका झाल्या मात्र विजय मिळविण्यात यश मिळाले. यानंतर तिने जबरदस्त खेळ दाखवत तिसरा आणि चौथा गेमही जिंकला. सिंगापूरच्या खेळाडूने पाचवा सेट जिंकला मात्र श्रीजाने सहावा सेट जिंकत इतिहास रचला.

दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसच्या राउंड ऑफ-१६ मध्ये प्रवेश करणारी श्रीजा अकुलाही दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मनिका बत्राने असा रेकॉर्ड केला होता. मनिका बत्राने राउंड ऑफ ३२ मध्ये प्रितिका पावडेला पराभूत करत राउंड ऑफ-१६ मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता दोन्ही महिला खेळाडूंची नावे भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहेत.

Exit mobile version