भारतीय नेमबाज आणि महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये कांस्यपदक मिळवत इतिहास रचला आहे. स्वप्नीलने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पदक मिळविले आहे. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्य पदक आहे. स्वप्नीलने एकुण ४५१.४ गुण प्राप्त करत विजय प्राप्त केला. दरम्यान, स्वप्नील भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो.
५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात महाराष्ट्राला ऑलंम्पिक पदक जिंकून देणारा स्वप्नील हा पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी कुस्तीतील पहिले वैयक्तिक पदक जिंकत अशी कामगिरी केली होती. स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. त्याने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. स्वप्नील २०१२ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत आहे, परंतु ऑलिम्पिक पदार्पणासाठी त्याला १२ वर्षे वाट पाहावी लागली. यावेळी स्वतःला शांत ठेवण्यासाठी त्याने धोनीच्या कथेवर आधारित चित्रपट अनेक वेळा पाहिल्याचे सांगितले. महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानत असल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे स्वप्नील धोनीप्रमाणे रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करतो.
स्वप्नील म्हणाला की, ‘मला रेंजवर शांत आणि संयमी राहायला आवडते. मी फारसा बोलत नाही. अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानात सामान्य दरम्यान कितीही दडपण असले तरी धोनी शांत राहायचा, मलाही माझ्या खेळात शांत राहायला आवडते, असे स्वप्नील म्हणाला.
हे ही वाचा:
श्री कृष्ण जन्मभूमी: मुस्लीम पक्षाला दणका, हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार
बालविवाह प्रतिबंधक कायदा सर्वधर्मीयांसाठी सारखाच
माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला