पॅरिस ऑलिम्पिक: सेमीफायनलमधील पराभवानंतर सेनचे कांस्यपदकावर ‘लक्ष्य’

कांस्य पदकासाठी मलेशियाच्या खेळाडूशी होणार सामना

पॅरिस ऑलिम्पिक: सेमीफायनलमधील पराभवानंतर सेनचे कांस्यपदकावर ‘लक्ष्य’

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार सध्या फ्रान्समध्ये रंगला असून आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन पदके जमा झाली आहेत. दरम्यान, भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष बॅडमिंटन एकेरीच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताच्या लक्ष्य सेनला पुरुष एकेरीत उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने पराभूत केले.

डेन्मार्कच्या एक्सेलसेनने २२-२०, २१-१४ अशा दोन सरळ गेममध्ये हा सामना जिंकला. लक्ष्य सेन याने त्याला कडवी झुंज दिली. लक्ष्य सेन हा पराभूत झाला असला तरी त्याला अजूनही पदक मिळवता येऊ शकते. सोमवार, ५ ऑगस्ट रोजी कांस्यपदकासाठी लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे. त्यामुळे भारताला चौथ्या पदकाची अपेक्षा नक्कीच असणार आहे.

दरम्यान, आज झालेल्या सामन्यात पहिल्या गेममध्ये सुरुवातीला लक्ष्य सेनने व्हिक्टर एक्सेलसेनवर वर्चस्व राखून ठेवले होते. मधला काही काळ लक्ष्य आणि व्हिक्टर दोघेही बरोबरीत होते. सामना रंगात आलेला असतानाचा लक्ष्यने व्हिक्टरवर आघाडी घेतली. लक्ष्यने ११ गुण मिळवले तेव्हा व्हिक्टर केवळ ९ गुणांवर होता. पण, पुढे गेम पालटला आणि व्हिक्टरला आघाडी घेण्याची संधी मिळाली. व्हिक्टरने जोरदार पुनरागमन करत पहिला गेम २२-२० असा जिंकला.

हे ही वाचा..

भारतीय हॉकी संघाने ब्रिटनला नमवले; पदकापासून एक पाऊल दूर !

मुस्लिम मुलांची ट्युशन घेणाऱ्या मुलीलाच केले मुस्लिम; उल्हासनगरात धक्कादायक प्रकार

‘विरोधकांना हवे ते म्हणू द्या, २०२९ मध्ये पुन्हा एनडीएचेच सरकार येणार’

श्रावणात एसटीसंगे तीर्थाटन उपक्रमाची उद्यापासून सुरुवात

व्हिक्टरविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर, लक्ष्य सेनने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. लक्ष्यने पहिल्या काही मिनिटांत व्हिक्टरवर ७-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे लक्ष्य सेन हा गेम जिंकून बरोबरी साधेल अशी अपेक्षा होती. पण, लक्ष्यने ७ गुण मिळवले तेव्हा व्हिक्टरने पहिला गुण मिळवला आणि पुढे काही वेळातच सामना पालटला. त्याने २१-१४ असा दुसरा गेमही जिंकला. दुसऱ्या गेम सोबतच विक्टर सलग आपल्या दुसऱ्या ऑलिम्पिक बॅडमिंटन फायनलमध्ये पोहोचला. गेल्या ऑलिम्पिकमध्ये विक्टरने या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवले होते. आता लक्ष्य सेन कांस्यपदकासाठी उद्या मलेशियाच्या खेळाडूशी भिडणार आहे.

Exit mobile version