भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कमाल, रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश !

पुढील सामना अमेरिका किंवा जर्मनीशी होण्याची शक्यता

भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कमाल, रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश !

श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करून महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारताचे आव्हान प्रथमच असून श्रीजा, अर्चना आणि मनिका यांच्या संघाने चमकदार कामगिरी करत रोमानियाचा पराभव केला. या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत ११व्या क्रमांकावर असलेल्या भारताने चौथ्या क्रमांकाचा संघ रोमानियाचा ३-२ असा पराभव केला.

या सामन्यात सर्वात पहिला श्रीजा आणि अर्चना या जोडीने आघाडी मिळवून दिली. या भारतीय जोडीने सलामीच्या लढतीत रोमानियाच्या एडिना आणि समारा जोडीचा ३-० असा पराभव करून आघाडी घेतली होती. या भारतीय जोडीने एडिना आणि समारा यांचा ११-९, १२-१०, ११-७ अशा फरकाने पराभव केला.

यानंतर मनिकाने पुढच्या सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात मनिकाने बर्नाडेटचा ३-० असा सहज पराभव केला. मनिकाने बर्नाडेटचा ११-५, ११-७, ११-७ अशा फरकाने पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने रोमानियावर २-० अशी आघाडी घेतली होती.

सुरवातीला दोन सामने जिंकत २-० अशी आघाडीघेवून चालणारी भारतीय टीम तिसऱ्या सामन्यात मागे पडली. श्रीजा ही समारा विरुद्धच्या रोमहर्षक एकेरी सामन्यात हरली. या सामन्यात समाराने श्रीजाचा ३-२ असा पराभव केला. श्रीजा आणि समारा यांच्यातील सामना खूपच चुरशीचा होता, ज्यात समाराने शेवटी ८-११, ११-४, ७-११, ११-६, ११-८ असा विजय मिळवला. श्रीजाने सामना गमावला असला तरी भारताची रोमानियावर २-१ अशी आघाडी होती.

हे ही वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

आसामनेही मनावर घेतले… आता लाडक्या बहिणींसाठी लव्हजिहाद विरोधी कायदा हवा!

बांगलादेशात आंदोलकांनी ‘बंगबंधू शेख मुजीबुर रहमान’ यांचा पुतळा फोडला !

बांगलादेशातील सत्तापालटानंतर बीएसएफकडून सर्व सीमेवर ‘हाय अलर्ट’

 

यानंतर अर्चना कामथला चौथ्या सामन्यात बर्नाडेटविरुद्ध ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. अर्चना या सामन्यात बर्नाडेटला आव्हान देऊ शकली नाही आणि तिला ५-११, ११-८, ७-११, ९-११ ने पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि रोमानिया यांच्यातील स्कोअर २-२ असा बरोबरीत होता आणि सामन्याचा निकाल पाचव्या आणि अंतिम सामन्यात लागला. या सामन्यात मनिकाने एडिना डियाकानूचा ३-० (११-५, ११-९, ११-९) असा पराभव केला. दरम्यान, भारताने रोमानियाचा ३-२ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना अमेरिका किंवा जर्मनीशी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version