नाशिक शहर, परभणी किशोरी-किशोर गटाचे नवे जेते

पिंपरी चिंचवड दोन्ही गटात उपविजेते ठरले

नाशिक शहर, परभणी किशोरी-किशोर गटाचे नवे जेते
यजमान नाशिक शहर, परभणी यांनी ” ३५व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” अनुक्रमे किशोरी व किशोर गटाचे विजेतेपद पटकावले. पिंपरी चिंचवड संघ दोन्ही गटात उपविजेता ठरला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असो. च्या विद्यमाने मनमाड नाशिक येथील स्व. माणकचंद ललवाणी इस्टेट (हेलिपॅड) मैदानातील मॅट वर सुरू असलेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात यजमान नाशिक शहरने चुरशीच्या लढतीत गतविजेत्या पिंपरी चिंचवडचा कडवा प्रतिकार ४३-३८ असा मोडून काढत सौ. राजश्री चंदन पांडे फिरता चषक व आम. सुहास(अण्णा) कांदे कायमस्वरूपी चषक आपल्या नावे केला.
शिवाय यजमान नाशिक शहर संघाला रोख रू. पाच लाख पारितोषिक बहाल करण्यात आले. सुरुवात झोकात करणाऱ्या नाशिकला पिंपरी चिंचवडच्या शिलकी तीन गड्यात गुण न घेता आल्याने नाशिकने आपल्या अंगावर लोण घेतला. मध्यंतराला पिंपरी चिंचवड कडे २०-१९ अशी आघाडी होती.पण विश्रांतीनंतर ७व्या मिनिटाला लोण देत नाशिकने ३३-३० अशी आघाडी घेतली. येथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. स्थानिक कबड्डी रसिकांच्या पाठिंब्यावर शेवटच्या मिनिटात आणखी एक लोण देत विजेतेपदावरील आपला दावा पक्का केला.
शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावेधक ठरलेल्या या सामन्यात अखेर नाशिकने बाजी मारत पहिल्यांदाच किशोरी गटाचे जेतेपद मिळविण्याचा मान पटकाविला. बिंदिशा सोनाराच्या तुफानी खेळाला या विजयाचे खरे श्रेय जाते. तिला यात ईशा दारोळेची चढाईत, तर हेतल हिरे, भुवनेश्वरी उर्दळ यांची पकडीची भक्कम साथ लाभली. पिंपरी चिंचवडच्या सोनाक्षी वाबळे, समृद्धी लांडगे, सिद्धी लांडे यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कोठे दिसलाच नाही.
हे ही वाचा:
संतोष देशमुख प्रकरण: वाल्मिक कराडंच मुख्य सूत्रधार, खंडणीसाठी केली हत्या
संजय राऊत यांनी पुन्हा दाखवले स्वबळ; मविआला डच्चू
प्रयागराजमध्ये हिंदू व्यावसायिकाच्या घराबाहेर आढळले गायीचे शिर
माझगाव येथे बेस्टच्या धडकेत ८४ वर्षीय महिला ठार

 

 

परभणीने किशोर गटाच्या अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवडचा ४४-२४ असा एकतर्फी पराभव करीत नारायण नागो पाटील फिरता चषक व आम. सुहास(अण्णा) कांदे कायमस्वरूपी चषक आपल्या नावे केला. झंझावाती सुरुवात करीत सुरुवातीला दोन लोण देत परभणीने पूर्वार्धात २६-१२ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात तोच जोश कायम राखत आणखी एक लोण देत सामना सहज खिशात टाकला. आर्यन पवार, किशोर जगताप यांच्या तुफानी चढाया, त्याला सोमेश्वर खोसे याची मिळालेली बचावाची भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा गेला.
मनिषा काळजे, विजय राठोड या पिंपरी चिंचवडच्या खेळाडूना या सामन्यात सूर सापडला नाही. या अगोदर झालेल्या किशोर गटाच्या उपांत्य सामन्यात परभणीने रत्नागिरीला ६२-२९ असे, तर पिंपरी चिंचवडने गतविजेत्या जालनाला ३९-३५ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. स्पर्धेचे बक्षीस वितरण आम. सुहास(अण्णा) कांदे, अंजुमताई कांदे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे मंगल पांडे, नाशिक जिल्हा कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष राजाभाऊ पगारे, सचिव मोहन (अण्णा) गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला.
Exit mobile version