मोहम्मद शमीसारखा कुशल गोलंदाज कोणताही प्रशिक्षक तयार करू शकत नाही, असे उद्गार भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी काढले आहेत. शमीने घेतलेल्या मेहनतीचे आणि त्याने स्वतःला ज्या पद्धतीने घडविले त्याबद्दल म्हांब्रे यांनी कौतुकोद्गार काढले.
म्हांब्रे म्हणाले की, चेंडूची शिवण सरळ रेषेत ठेवून प्रत्येक चेंडू टाकण्याची हातोटी शमीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच तो भेदक आणि धोकादायक गोलंदाज ठरतो. शिवाय, सगळ्या क्रिकेट प्रकारात त्याची ही भेदकता कायम राहते. वनडे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ३३ वर्षीय शमीने २४ बळी घेतले आणि तो गोलंदाजांमध्ये अव्वल ठरला.
म्हांब्रे हे सध्या भारतीय संघाच्या गोलंदाजांचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत पण शमीच्या यशात आपला वाटा ते मागत नाहीत. शमीसारखी गुणवत्ता पुन्हा भारताला मिळेल का, या प्रश्नावर ते म्हणतात की, जर मी म्हणेन की शमीसारख्या गोलंदाजांना प्रशिक्षक घडवतात तर मी खोटे बोलत आहे. त्याची जी गोलंदाजी आहे, त्यासाठी त्याने अफाट मेहनत घेतली आहे. शिवण सरळ रेषेत ठेवून मनगटाची स्थिती योग्य ठेवत दोन्ही स्विंग करणे हे शमीचे कौशल्य आहे.
म्हांब्रे यांनी जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले. एक वेगळी शैली असलेला बुमराह एकाच शैलीत गोलंदाजी करत दोन्ही स्विंग करू शकतो. प्रचंड मेहनत घेतल्यानंतरच ही कला साध्य होऊ शकते.
हे ही वाचा:
पासपोर्टसाठी महिला पोलीस ठाण्यात आली, इन्स्पेक्टरने चुकून डोक्यात गोळी झाडली!
‘हिंदूंना संपविण्याची भाषा करणाऱ्या अकबरुद्दीन ओवैसींकडून शपथ घेणार नाही!’
खमक्या भूमिकेमुळे जरांगेंची कोंडी
‘वाँटेड’ गुन्हेगारांनी भारतात या आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा!
जगभरातील फलंदाजांवर हे दोन्ही गोलंदाज अधिराज्य गाजवतात याचे म्हांब्रे यांना आश्चर्य वाटते. ते म्हणतात की, कसोटी क्रिकेटमध्ये आपल्याकडे बुमराह, शमी आणि इशांत शर्मा होते, पण आता अशीच कामगिरी होईल, असे मला वाटत नव्हते. मात्र आता जागतिक स्तरावर आपण अशी कामगिरी करत आहोत. वर्ल्डकप, इंग्लंडमधील वनडे मालिकेतील यश आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघावर विजय मिळविल्याबद्दल म्हांब्रे म्हणतात की, गेल्या दोन वर्षांत क्रिकेटच्या सर्व प्रकारात आम्ही राखीव खेळाडूंची फळी तयार केली. ३-५ गोलंदाज निवडून त्यांना पुढील आव्हानांसाठी सज्ज करण्याचे आम्ही ठरविले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी ते तयार होतील याचा विचार केला.