पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस!

भारताच्या खात्यात यंदाच्या वर्षी २९ पदके

पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस!

नुकीतच फ्रान्समधील पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या खात्यात यंदाच्या वर्षी २९ पदके आली आणि पॅरालिम्पिकमधील भारताचे हे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. यापूर्वी भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १९ पदके जिंकली होती. खेळाडूंच्या या जबरदस्त कामगिरीनंतर देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल केंद्र सरकारनेही घेतली असून त्यांना रोख बक्षिसांची घोषणा केली आहे.

पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदके जिंकली. या आकडेवारीसह भारत या स्पर्धेत १८ व्या क्रमांकावर आहे. ही या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. या कामगिरीनंतर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या सर्व खेळाडूंचा सत्कार केला. तसेच त्यांना रोख बक्षिसांचीही घोषणा केली. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक विजेत्यांना ७५ लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना ५० लाख रुपये आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ३० लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्याची घोषणा क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

उमर गौतमसह १४ जणांची धर्मांतरणाची टोळी दोषी !

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनाच लाल चौकात जाण्याची भीती वाटत असे!

हरियाणा निवडणुकीसाठी भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर !

अजित पवार म्हणतात, अमित शहांसमोर मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला नाही

पॅरालिम्पिकमध्ये भारत २९ पदकांसह १८ व्या क्रमांकावर राहिला. भारताला सर्वाधिक १७ पदके ऍथलेटिक्समध्ये मिळाली. या १७ पदकांमध्ये चार सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. तर, बॅटमिंटनमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी पाच पदके आहेत. नेमबाजीत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी ४ पदके भारताला मिळाली. तिरंदाजीत भारताला एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळाले आहे. ज्युदोमध्येही भारताला पदक मिळाले.

Exit mobile version